
सावंतवाडी : गांधी चौक येथील काश्मीर पेहेलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निषेधार्थ फेकलेला पाकिस्तानचा राष्ट्रध्वज एका 'पाक' धार्जिण्या भाजी विक्रेत्याने उचलून आपल्या दुकानात नेऊन गुंडाळून ठेवल्याने तणाव निर्माण झाला होता. या घटनेमुळे संतप्त झालेल्या हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भाजी विक्रेत्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले असता याप्रकरणी आरोपी फिरोज भाउद्दीन ख्वाजा (वय ५५, रा. कोलगाव) याच्या विरोधात राष्ट्रीय एकोप्यास बाधक अशी कृती केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी कृष्णाराजे धुळपनवर (वय २८, रा. कोलगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली. फिरोज भाउद्दीन ख्वाजा याने गांधी चौकातून पाकिस्तानचा ध्वज उचलून तो गुंडाळून आपल्या दुकानात सुरक्षित रित्या नेऊन ठेवल्यामुळे त्याने एक प्रकारे काश्मीर येथे झालेल्या त्या दहशतवादी कृत्याचे समर्थन केले आणि देशप्रेमींच्या भावना दुखावल्या. त्याच्या या कृत्यामुळे सार्वजनिक शांतता भंग पावण्याची शक्यता होती, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी फिरोज ख्वाजा याच्या विरोधात भा.द.वि. कलम १५३ (अ) दोन भिन्न गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.