मनाई आदेश भंग प्रकरण ; 14 जणांची निर्दोष मुक्तता

Edited by: विनायक गांवस
Published on: April 02, 2024 14:25 PM
views 274  views

सावंतवाडी : कोव्हीड काळात मनाई आदेशाचा भंग करून जनआशीर्वाद सभा घेतल्या प्रकरणी सावंतवाडी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्या प्रकरणी आज 14 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 28 ऑगस्ट 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशिर्वाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान सावंतवाडी येथील कार्यक्रमाचे आयेजन करण्यात आले होते.

यावेळी भाजप पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सभांचे आयोजन करून बेकायदेशीर जमाव करून जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या मनाई आदेशाचा भंग केला तसेच ब्रेक द चैन अनुषंगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या आदेशाचा भंग करून कोविड विषाणू संसर्ग फैलावण्यास कारणीभूत होईल असे कृत्य केल्याचा ठपका ठेवून गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज यातील महेश सारंग, संतोष राऊळ, संदेश राऊळ, दिनेश सारंग, अजय गोंदावळे, संजू परब, केतन आजगावकर, बंटी पुरोहित, मोहिनी मडगावकर, आनंद नेवगी,मनोज नाईक, सुधीर आडीवरेकर, दिलीप भालेकर, महेश पांचाळ अशा 14 जणांची सावंतवाडी दिवाणी न्यायालयात न्यायाधीशांकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली. 

सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी सतीश कविटकर, दोन पंच अमित राऊळ व आबा दळवी व तपासणीक अधिकारी तौसिफ सय्यद यांची साक्ष झाली. या कार्यक्रमात कोविड 19 च्या नियमाचा भंग झाला व साथ पसरविण्याचा कोणताही उद्धेश आरोपीचा नव्हता. त्याच प्रमाणे प्रतिबंधत्मक आदेश सर्व आरोपीनी भंग केला हे सरकार पक्षाने शाबीत केले नाही असा युक्तिवाद आरोपीच्यावतीने करण्यात आला. आरोपीच्या वतीने अँड. परिमल नाईक व अँड. अनिल निरवडेकर यांनी काम पाहिले.