बेकायदा गुरे वाहतूक करणारी गाडी ताब्यात

युवकांनी पाठलाग करून गाडी अडवली
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 03, 2023 11:42 AM
views 696  views

मालवण : बेकायदा गुरे वाहतूक प्रकरणी मालवणात एक बोलेरो पिकअप गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. या गाडीतून बेकायदा गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच शहरातील जागृत युवकांनी पाठलाग करून ही गाडी देऊळवाडा सागरी महामार्ग येथे अडवून याठिकाणी पोलिसांना पाचारण केले. ही गुरे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत असून या प्रकरणी पोलिसांनी ठोस कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या गाडीवर यापूर्वी दोनवेळा गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे समजते. ही घटना शुक्रवारी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.

मालवण तालुक्याच्या ग्रामीण भागातून एका टेम्पो मधून बेकायदा गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच मालवण मधील तरुणांनी फिल्डिंग लावत हा टेम्पो गाठून त्याचा पाठलाग सुरु केला. अखेर देऊळवाडा सागरी महामार्ग येथे सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास हा टेम्पो अडवून त्याची तपासणी केली असता पूर्ण बंदिस्त केलेल्या या टेम्पोच्या आतमध्ये तीन गुरे दिसून आली. यामध्ये एक गाय, एक बैल आणि एक वासरू मिळून आले. या गाडीच्या चालकाकडे विचारणा केली असता त्याच्याकडून विसंगत उत्तरे मिळाल्याने याठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर हा टेम्पो पोलीस ठाण्यात नेण्यात आला. यावेळी सीझर डिसोजा, ललित चव्हाण, अनिकेत फाटक, सिद्धेश मांजरेकर, उमेश चव्हाण, पंकज गावडे, पार्थ वाडकर, संदेश फाटक, शैलेश नामनाईक आदींचा समावेश होता. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरु आहे.

मालवणात आज गुरांची वाहतूक करताना आढळलेल्या टेम्पोवर यापूर्वी दोनवेळा गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे समजते. ही गुरे बेळगाव मध्ये कत्तलीसाठी नेण्यात येत असून संबधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.