'वी लीड' अंतर्गत क्षमता बांधणी कार्यशाळा !

Edited by: दिपेश परब
Published on: April 10, 2025 18:24 PM
views 74  views

वेंगुर्ले : कोकण डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने भारतात विविध ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या 'वी लीड' उपक्रमाची सुरुवात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये झाली आहे. या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २० आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा व चंदगड तालुक्यांमधील १० अशा एकूण ३० ग्रामपंचायतींमध्ये विविध कार्यक्रम महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणार आहेत. 

'वी लीड' हा उपक्रम विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणावर केंद्रित आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांचे नेतृत्व बळकट करणे आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा सक्रीय सहभाग वाढवणे हा आहे. या उपक्रमाअंतर्गत महिलांना पंचायत राज व्यवस्था, शासन योजना, स्थानिक प्रशासन, कायदे आणि हक्क यांची माहिती देण्यात येते. त्याचबरोबर त्यांच्यात नेतृत्वगुण, संवादकौशल्य, समस्या सोडविण्याची क्षमता, आर्थिक व डिजिटल साक्षरता यासारख्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी विविध प्रशिक्षण सत्रे घेतली जातात.

'वी लीड' उपक्रमाच्या माध्यमातून महिला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामीण भागातील सर्वसामान्य महिला, युवक आणि पुरुष यांना एकत्र आणून सामूहिक जबाबदारी आणि सहभाग वाढवण्यावर भर दिला जातो. हा उपक्रम तीन वर्षे चालणार असून, स्थानिक सामाजिक संस्थांच्या सहकार्याने तो प्रभावीपणे राबवला जातो.

या उपक्रमांतर्गत पंचायत राज, महिला सक्षमीकरण, लिंगभेद दरी कमी करणे, आणि महिला प्रतिनिधींची निर्णय क्षमता वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट असून त्यासाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, समता प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, सामाजिक संवेदना संस्था (आजरा), दिशा सामाजिक संस्था (चंदगड) आणि सिंधुदुर्ग डायोसिस डेव्हलपमेंट सोसायटी या संस्थांची निवड करण्यात आली आहे.

या संस्थांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २० आणि कोल्हापूर जिल्ह्यातील १० ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला, युवक, युवती आणि पुरुष यांच्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी वरील संस्थांचे प्रतिनिधी सचिन परुळकर, संजय कदम, प्रकाश मोरुस्कर, विद्या तावडे, रेवती वालावलकर यांचे क्षमता बांधणी शिबिर नुकतेच सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी कोकण डेव्हलपमेंट सोसायटीचे संचालक फादर जोएल डिसोजा आणि  कॅजिटन रॉड्रिक्स, केंद्रीय संचालक नोव्हा रॉड्रिक्स, समन्वयक राजेंद्र कांबळी, पदाधिकारी अफसाना कुयतावले आदींनी उपस्थित राहून 'वी लीड' उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. तसेच, पुढील तीन वर्षे चालणाऱ्या या उपक्रमाच्या कार्यपद्धतीवर आधारित कार्यशाळा देखील घेण्यात आली.सदर क्षमता बांधणी कार्यशाळेबाबत संस्था प्रतिनिधींनी समाधान व्यक्त करत 'वी लीड' उपक्रम संबंधित ग्रामपंचायतींमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला.