
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याने पक्षाच्या शिस्तभंगाच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलेले जिल्हा चिटणीस एकनाथ नाडकर्णी यांचे निलंबन रद्द केले आहे. नाडकर्णी यांनी केलेल्या विनंती अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आणि पक्षातील त्यांच्या योगदानाला महत्त्व देत हा निर्णय घेण्यात आल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी म्हटले आहे.
नाडकर्णी यांच्यावर यापूर्वी पक्षशिस्तीच्या विरोधात काम केल्याचा आरोप होता. ज्यामुळे तत्कालीन परिस्थितीनुसार त्यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले होते. मात्र, आता त्यांना पुन्हा पक्षकार्यात सक्रिय होण्याची संधी देण्यात आली आहे. भाजप
जिल्हाध्यक्ष सावंत यांनी नाडकर्णी यांना शुभेच्छा देत यापुढे त्यांनी भारतीय जनता पार्टीचे काम अधिक जोमाने करून पक्षवाढीसाठी सक्रिय योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.