
वैभववाडी : शेती हंगाम सुरू झाल्यानंतरही पाटबंधारे विभागाची कालव्याची कामे सुरू आहेत.यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कालव्यांसाठी खोदाई केलेली माती येणार आहे.ठेकेदारांनी ही कामे त्वरित न थांबवल्यास ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी दिला आहे.
तालुक्यात अरुणा मध्यम प्रकल्प व कुर्ली प्रकल्पाच्या कालव्यांची कामे सुरू आहेत.कालव्यांचे पाईप टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदाई केली आहे.काही ठिकाणी शेतीतून तर काही भागात शेती नजीक खोदाई केली आहे.त्यामुळे ही माती पावसाने शेतात येण्याची शक्यता अधिक आहे.
तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतातच माती असल्याने मशागतीची कामे करण्यासाठी अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांनी ठेकेदाराला याची कल्पना देऊनही ही माती अद्याप काढण्यात आली नाही.अधिकारी वर्गही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.हे अधिकारी ठेकेदारासाठी काम करीत आहेत असा आरोप रावराणे यांनी केला आहे. संबधित ठेकेदारांनी शेतकऱ्यांच्या शेतातील माती न हटवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रावराणे यांनी दिला आहे.