माझ्या विरोधात बदनामीची मोहीम सुरू : दीपक केसरकर

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 16, 2024 07:41 AM
views 272  views

सिंधुदुर्गनगरी : आगामी निवडणुकी युतीच्या माध्यमातूनच लढवली जाईल. सिंधुदुर्ग ही देवभूमी आहे. सर्व काही नीटनेटके होईल.देशातील पहिले साई मंदिर ही इथेच झाले आहे.असा उपरोधिक टोला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पालकमंत्री आणि आपल्यात चाललेल्या शीतयुद्धाबाबत विचारले असता सांगितले.

माझ्या विरोधात राजकीय पटलावर बदनामीची विशिष्ट मोहीम सुरू आहे. याबाबत वरिष्ठ निश्चितच दखल घेतील. त्यामुळे मी राजकीय भाष्य करणार नाही तर महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा यावे म्हणून प्रयत्न करत राहीन असे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

जिल्हा मुख्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी केसरकर बोलत होते. केसरकर म्हणाले, राज्यात महायुतीची सत्ता आहे. पुन्हा येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती केली जाणार आहे. तसेच महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा एकदा यावे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, माझ्या विरोधात राजकीय पटलावर बदनामीची विशिष्ट मोहीम सुरू आहे. हे महायुतीला शोभणारे नाही. वरिष्ठ नक्कीच भूमिका घेतील. त्यामुळे मी भाष्य करणार नाही असे केसरकर यांनी सांगितले. महायुतीने एकत्रित विधानसभा निवडणुक लढवली पाहिजे म्हणून चर्चा सुरू असतानाच मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावर मी बोलणार नाही. मात्र वरिष्ठांनी नोंद घेतली आहे. एवढंच यावेळी सांगतो असे त्यांनी सांगितले.