
कुडाळ : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गाईचे वासरू गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी माणगाव मळावाडी येथे घडली आहे. सुदैवाने या हल्ल्यानंतर स्थानिकांनी धावधाव करून या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातून वासराची सुटका केली आणि या वासराचे प्राण वाचवले आहेत. मात्र या हल्ल्यामुळे जखमी वासरावर दहा टाक्यांची शस्त्रक्रिया करावी लागली आहे.पोल्ट्री व्यावसायिक पोल्ट्रीतील चिकन कापून राहिलेले वेस्टेज उघड्यावर टाकत असल्याने अशा पद्धतीच्या घटना घडत असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत अधिक माहिथी अशी शनिवारी मळावाडी येथे शेतात चारा खात असलेल्या विनय आडेलकर यांच्या खिल्लार जातीच्या वासरावर या भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. सुमारे वीस भटक्या कुत्र्यानी या वासराला जमिनीवर पाडत त्याचे चावे घेत लचके तोडण्यास घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर तेथील स्थानिक रहिवाशी विहार आडेलकर, माया नानचे, सुषमा नानचे, भाऊ नानचे यानी धाव घेत या कुत्र्यांना पिटाळून लावले. मात्र तोपर्यंत या कुत्र्याने या वासराच्या अंगावर अनेक ठिकाणी चावे घेत त्याला गंभीर जखमी केले होते.त्यानंतर पशुवैद्यकीय भाईप यांनी या वासरावर दहा टाक्यांच्या शस्त्रक्रियेसह जखमावर उपचार केले.
दरम्यान गेल्या वर्षभरापासून भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून यापूर्वीही या भटक्या कुत्र्यांनी पाळीव जनावरावर हल्ले करीत त्यांना गंभीर जखमी केले आहे. पोल्ट्रीतील टाकाऊ वस्तु मळावाडी परिसरात टाकत असल्यामुळे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाचेही लक्ष वेधण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतेही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने पोल्ट्रीतील टाकाऊ वस्तु उघड्यावर टाकणाऱ्याना समज द्यावी तसेच या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे.
दरम्यान माणगाव सरपंच सौ.मनिषा भोसले यांचे लक्ष वेधले असता संबंधिताना वारंवार सुचना देवून सुद्धा पोल्ट्री व्यावसायिक दुर्लक्ष करीत असल्याचे सांगत यापुढे कायदेशीर कारवाई करून सदर पोल्ट्री चा परवाना रद्द करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर कारवाई करण्याबाबत पत्रव्यवहार केले जातील असे म्हटले आहे.दरम्यान याबाबत नाराजीचा सूर माणगाव वासियांकडून व्यक्त होत आहे.