कै. पुष्पसेन सावंत यांच्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापक दीपक आळवे यांचा सन्मान

Edited by: भरत केसरकर
Published on: September 02, 2023 13:04 PM
views 107  views

कुडाळ : श्री. कालिका प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. पुष्पसेन सावंत जयंती कार्यक्रम व डिगस माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक सचिदानंद आळवे यांचा आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व संस्था यांच्यावतीने नागरी सत्कार सोहळा आज डिगस येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला  कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

 आ. वैभव नाईक म्हणाले, माजी आमदार कै. पुष्पसेन सावंत यांचे लोकाभिमुख कार्य होते. लोकसेवेसाठी  ते अहोरात्र झटत होते. सत्ता असो अथवा नसो त्यांच्या समाजकार्यात कधी खंड पडला नव्हता. त्यांचा आदर्श घेऊन काम करणे आणि त्यांच्या सारखा लोकप्रतिनिधी बनणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. त्यांचे चिरंजीव अमरसेन सावंत आणि भूपतसेन सावंत हे त्याच पद्धतीने वाटचाल करीत आहेत. त्यांना आम्ही संपूर्ण सहकार्य करू. कै. पुष्पसेन सावंत यांना  शिक्षण संस्था शून्यातून उभी करताना दिपक आळवे यांची साथ लाभली. गेली अनेक वर्ष दिपक आळवे यांनी  मुख्याध्यापक म्हणून चांगले काम केले. त्यामुळेच त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्याला आज एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. असे सांगत त्यांच्या पुढील वाटचालीस आ. वैभव नाईक यांनी शुभेच्छा दिल्या. संस्थेच्यावतीने आ. वैभव नाईक यांचा शाल - श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी श्री. कालिका प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संस्थेचे अध्यक्ष अमरसेन सावंत, उपाध्यक्ष विठ्ठल पवार, सचिव भूपतसेन सावंत, माजी उपसभापती जयभारत पालव, बाळू पालव, माणगांव हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक विजयप्रकाश आकेरकर, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष महादेव मातोंडकर,पांग्रड हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक सदानंद तावडे, सिंधुदुर्ग जिल्हा माध्य. व उच्च माध्य. शाळा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष वामन तर्फे यांसह संस्थेचे सर्व संचालक, शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी व डिगस ग्रामस्थ मोठ्या संख्येने  उपस्थित होते.