
सावंतवाडी : सावंतवाडी रोड टर्मिनस भूमिपूजन झाले तसे नामकरण करण्यासाठी कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला जाईल. रस्ता मंजूर असून बैठक आयोजित करून चर्चा घडवली पाहिजे असे आपण कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्याशी बोललो आहे असं मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. घंटानाद आंदोलनाप्रसंगी ते बोलत होते.
सावंतवाडी रोड टर्मिनस वर रेल्वे गाड्यांना थांबा, टर्मिनसला प्रा मधू दंडवते यांचे नाव, गाड्यात पाणी भरण्याची सुविधा अशा विविध मागण्यांसाठी सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने घंटानाद आंदोलन छेडले. यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, भाजपचे माजी आमदार राजन तेली, ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ आदींनी भेट देऊन घंटानाद आंदोलनाला प्रतिसाद दर्शविला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. टर्मिनस नामकरण, रेल हाॅटेल, रस्ता व एक बैठक आयोजित करावी आदींबाबत सविस्तर चर्चा केली. केसरकर म्हणाले, सावंतवाडी रोड टर्मिनस भूमिपूजन झाले तसे नामकरण करण्यासाठी कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला जाईल. रस्ता मंजूर असून बैठक आयोजित करून चर्चा घडवली पाहिजे असे आपण कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्याशी बोललो आहे. रेल्वेत पाणी भरण्यासाठी योजना राबविली जाणार असून मळगाव, कुंभार्ली व वेत्ये गावालाही पाणी पुरवठा होईल अशा स्वरूपाचा आराखडा बनवला आहे असे केसरकर यांनी सांगितले.तसेच रेल हाॅटेल प्रकल्पही मंजूर करण्यात आला आहे. कोकण रेल्वेशी अधिक चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.
भाजपचे माजी आमदार राजन तेली म्हणाले, रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून मागण्या पोहचवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जातोय. रेल्वे प्रवासी संघटना रेल्वे रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहे त्याला माझा पाठिंबा आहे. प्रसंगी नेतृत्व देखील करेन. त्यासाठी प्रवाशांची एकजूट महत्त्वाची आहे. रेल्वे यंत्रणा दाद देत नसेल तर वठणीवर आणण्यासाठी एकजूट दाखवावी. नाक दाबल्या शिवाय तोंड उघडणार नाही असे त्यांनी सांगितले. तसेच ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, मायकल डिसोझा यांनी भेट देऊन घंटानाद आंदोलनाला प्रतिसाद दिला. त्यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना रेल्वे प्रवासी संघटनेच्या बरोबर आहे असे सांगितले. याप्रसंगी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, अँड. नकुल पार्सेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,नंदू तारी, बाळासाहेब बोर्डेकर,अभिषेक शिंदे, भुषण बांदिवडेकर, सागर तळवणेकर, सागर नाणोसकर, लीलाधर घाडी, नरेंद्र तारी, सुधीर राऊळ, प्रथमेश पाडगांवकर, विनोद नाईक, आदी मान्यवर उपस्थित होते.