
वैभववाडी : तालुक्यातील प्रसिद्ध व्यापारी नामदेव भोवड (वय ६०) यांचे कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी (८ नोव्हेंबर)निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी वैभववाडीत समजताच शहरात शोककळा पसरली. व्यापाऱ्यांनी दुपारनंतर बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मूळ फोंडा गावचे असलेले नामदेव भोवड व्यापारानिमित्ताने वैभववाडी येथे राहत होते. 'पानवाले भोवड' म्हणून ते तालुक्यात परिचित होते. शांत व मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचे तालुक्यातील लोकांशी हितसंबंध होते. श्री. भोवड यांना हृदयविकाराचा त्रास होता. तीन चार वर्षांपूर्वी त्यांची हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती.अलीकडे त्यांना पुन्हा हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला होता. दरम्यान तीन चार दिवसांपूर्वी त्यांना कोल्हापूरातील एका खासगी रूग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली. मात्र पुढील उपचार सुरू असताना बुधवार दिनांक ८ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
त्यांचे निधन झाल्याचे समजताच वैभववाडीत शोककळा पसरली. व्यापाऱ्यांनी तातडीने दुकाने बंद केली. सायकांळी उशिरा त्यांचे पार्थिव कोल्हापूर येथून आणले जाणार होते. अनेक व्यापाऱ्यांनी त्यांच्या घराजवळ गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक विवाहीत मुलगी, भाऊ, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.