वरसेत डम्पिंग ग्राऊंड अभावी कचऱ्याचा बोजवारा

येत्या 7 ते 8 दिवसात जागेचा प्रश्न तातडीने सोडवणार : ग्रामसेवक गुट्टे
Edited by: शशिकांत मोरे
Published on: January 16, 2023 17:37 PM
views 152  views

रोहा : तालुक्यात असलेल्या वरसे ग्रामपंचायतमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून डम्पिंग ग्राऊंड अभावी नागरीक घरातील कचरा इतर टाकताना दिसत आहेत. यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वरसेतील नागरिक कचरा कुठेही टाकत आहेत. दत्ताचा माला हा ग्राऊंड परिसरात लगत असलेला नाला त्या परिसरात नागरिकांनी कचरा टाकून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. वरसे ग्रामपंचायतमध्ये गेले तीन ते चार महिन्यापासून डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला अद्याप जागेचा तिढा सोडविता आला नसल्याने दिवसेंदिवस कचरा प्रश्न जटील बनला आहे. वरसे ग्रामपंचायतीमध्ये तसे पाहता नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जवळपास दहा हजार लोकसंख्येच्या वरती या ठिकाणी नागरीक राहत आहेत. अनेक इमारती उभे राहत असताना मात्र ग्रामपंचायत कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यात हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

परिणामी आगामी काळात वरसेतील नेते व ग्रामपंचायत प्रशासन डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न सोडविण्यात यशस्वी होतील का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तर नागरिकांनी कचरा संदर्भात ग्रामपंचायतला सहकार्य करणे गरजेचे आहे, कचरा रस्त्यावर न टाकता योग्य ठिकाणी टाकावा, असेही बोलले जात आहे.

या विषयासंदर्भात ग्रामसेवक अशोक गुट्टे यांच्याशी संपर्क साधला असता नागरिकांची गैरसोय होते, याची आम्हाला कल्पना असून येत्या ७ ते ८ दिवसात जागेचा प्रश्न तातडीने सोडवणार असल्याची माहिती ग्रामसेवक गुट्टे यांनी दिली.