
सावंतवाडी : माजी खासदार आणि ठाकरे शिवसेना नेते विनायक राऊत हे १९ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडीतील बीएसएनएल कार्यालयाला भेट देणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार असताना त्यांनी अनेक मोबाईल टॉवर मंजूर केले होते तसेच बीएसएनएलच्या सुविधाही सुधारल्या होत्या. मात्र, आता अनेक गावांतील मंजूर टॉवरचे काम रखडले आहे आणि बीएसएनएलची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक टॉवर नादुरुस्त अवस्थेत बंद असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत.
या पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी बीएसएनएल कार्यालयाला भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या गावांमध्ये बीएसएनएलबाबत तक्रारी आहेत, त्या गावातील नागरिकांनी सोमवारी १९ मे रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी येथील बीएसएनएल कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन ठाकरे शिवसेना सावंतवाडी मतदारसंघाचे विधानसभाप्रमुख रुपेश गुरुनाथ राऊळ यांनी केले आहे.