
सावंतवाडी : सांगली येथे घेण्यात आलेल्या भारतातील सर्वात मोठ्या '21व्या सुरज' रॅपिड सोळा वर्षाखालील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन तब्बल सहा पारितोषिके पटकावली. या स्पर्धेत विविध राज्यांतील पाचशे पन्नासपेक्षा जास्त मुला-मुलींनी सहभाग घेतला होता.
ॲकेडमीच्या आठ ते तेरा वर्षाच्या दहा मुला-मुलींनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला. या कामगिरीमुळे मुक्ताई ॲकेडमीला "बेस्ट ॲकेडमी" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे सलग तीनवेळा "बेस्ट ॲकेडमी" पुरस्कार मिळवणारी मुक्ताई ॲकेडमी ही कोकणातील एकमेव ॲकेडमी ठरली आहे. राजापूर येथे झालेल्या राॅयल चेस ॲकेडमी आयोजित दुस-या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सहा पारितोषिके मिळवली.यावेळी मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांचा विद्यार्थ्यांसाठी करत असलेल्या कार्याची दखल घेऊन सन्मान करण्यात आला.
यात विभव राऊळ, यथार्थ डांगी, यश सावंत, हर्ष राऊळ, साक्षी रामदुरकर, गार्गी सावंत, चिदानंद रेडकर, बृंधव कोटला, विघ्नेश अंबापूरकर, पार्थ गावकर, मानस सावंत, विराज दळवी, पुष्कर केळूसकर, लिएण्डर पिंटो, अद्विक पाटील यांनी विशेष प्राविण्य मिळवले. राणीसाहेब शुभदादेवी भोंसले आणि युवराज लखमराजे भोंसले यांनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करतानाच मुक्ताई ॲकेडमीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.मागील दहा वर्षात ॲकेडमीचे विदयार्थी-विदयार्थिनी जिल्हास्तरीय स्पर्धांबरोबरच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळवत आहेत.