पारंपरिक प्रथेला फाटा देत तिने दिला आईच्या चितेला अग्नी..!

समाज व्यवस्थेसमोर मृदुला (अर्चना) मनोज कुंभार हीचा आदर्श
Edited by: संदीप देसाई
Published on: September 04, 2023 21:36 PM
views 672  views

संदीप देसाई | सिंधुदूर्ग : हिंदू समाजामध्ये आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाला चितेला अग्नी देण्याचा अधिकार असतो अशी परंपरा आहे. किंबहुना मुलगा नसेल तर त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी पुरुष नातेवाईक हे कर्तव्य पार पाडतात. मात्र  हेवाळे बाबरवाडी येथील रघुनाथ व्यंकटेश कुंभार यांची स्नुषा, मृदुला (अर्चना) मनोज कुंभार हिने रुढी पंरपरेने जखडलेल्या समाज व्यवस्थेला मागे सारत आपल्या आईच्या चीतेला अग्नी देत समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केलाय. डोंगराएवढ दुःख पदरी आलेलं असताना तिने दाखवलेलं अस धाडस आणि विचार परिवर्तनाचं नीच्छितच स्वागत करायला हवं. प्रस्थापित समाज व्यवस्थेला बाजूला ठेवत मुलगा - मुलगी समान आहेत, हेच तिनं कृतीसहित सिद्ध करत समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. मृदुलाची ही कृती नक्कीच समाज बदलाची नांदी ठरेल. 

हेवाळे बाबरवाडी येथील रघुनाथ व्यंकटेश कुंभार यांची स्नुषा, मृदुला (अर्चना) मनोज कुंभार हिच्या आईचे रविवारी कुडाळ येथे निधन झाले.  मृदुला हिचे माहेर कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक. अर्चनाला भाऊ नाही तर आणखी दोन बहिणी. त्यामुळे अर्चना हिनेच मागील १८ वर्षे आपल्या आईचा संभाळ केला. अन्य दोन बहिणी वेगवेगळ्या गावी स्थायिक आहेत. तर मृदुलाचे कुटुंबही व्यवसायानिमित्त कुडाळ येथे स्थायिक झाले. मात्र मागील काही वर्षांपासून आईच्या आजारपणात अर्चना व तिच्या कुटुंबानेच मनापासून आईची सुश्रुषा केली. रवीवारी ३ सप्टेंबरला तिच्या आईचे निधन झाल्यानंतर तीचे सर्व विधी तीच्या गावी हरकुळ येथे करण्याचे ठरविले होते. परंतु तेथील प्रतिकुल परिस्थितीमुळे अंत्यविधी कुडाळ येथे करण्याचे ठरविले. मृतदेहाचे सर्व सोपस्कार त्यांच्या अपार्टमेंटमधील लोकांनी केले. परंतु प्रश्न उभा राहिला तो मृतदेहाला अग्नि कोण देणार? अर्चनाला सख्खा भाऊ नसल्याने तिच्या आईच्या चितेला अग्नी कोण देणार असा प्रश्न होता. मात्र अर्चना हिनेच स्वतः आईला अग्नी देण्याचा मोठा निर्णय घेतला .

आईच्या चितेला स्वतः अग्नी देण्याचे तिनं ठरविले. कायम मितभाषी असणारी मृदुला (अर्चना) हिने हा निर्णय घेतल्याने निश्चितच तिच्या सासरच्या कुटुंबातील व्यक्तींना आश्चर्य वाटले. पण नवरा मनोज रघुनाथ कुंभार व सासरे रघुनाथ व्यंकटेश कुंभार यांनी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, असा धीर देत मृदुलाच्या निर्णयाचं स्वागत केलं. अखेर तिने सारासार विचार करून मुलानेच आई - वडिलांच्या चीतेला अग्नी दिला पाहिजे, ही प्रथा सामाजिक बंधने बाजूला सारून स्वतः मोठा निर्णय घेतला. आणि एका मुलाचे कार्य पार पाडत तीने आईच्या चितेला अग्नी दिला. 

 कोणत्याही आई-वडिलांना आपला मुलगा किंवा मुलगी ही समसमान असतात. दोघांनाही सारखेच हक्क प्राप्त व्हायला हवेत असं आपण फक्त बोलण्यातून ऐकतो. पण सुरुवात कोणी करायची हा प्रश्न असतो. या सर्वाला मृदुलाने कृतीतून फाटा दिलाय. ज्या आई-वडिलांना मुलगा नाही, अशा कुटुंबातील पुरुष मंडळी मृत व्यक्तींच्या चितेला अग्नी देतात. मात्र आईच्या प्रेमात व संस्कारात वाढलेली मृदुला मनातून खूप सक्षम बनली होती. आईने दिलेले संस्कार जपत दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे बाबरवाडी नव्हेच तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वांसमोर एक नवा आदर्श ठेवला.  मुलींनी स्मशानात जाऊ नये हा अधोरेखित समज तिने मोठ्या धाडसाने यातून खोडून काढला आहे. आजही समाजामध्ये एखाद्या बहिणीला भाऊ नसेल तर हिनवलं जात. मात्र इथ मृदुलाने परंपरेने जखडलेल्या समाजात एका मुलाच कर्तव्य पार पाडून आजच्या नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण केलाय . पुन्हा एकदा तीच्या कर्तृत्वाला सलाम.