'हर घर तिरंगा' ; वेंगुर्लेत देशरक्षकांचा शौर्यगौरव

निवृत्त सैनिक सन्मान समारंभ थाटात
Edited by: दिपेश परब
Published on: August 19, 2025 14:29 PM
views 28  views

वेंगुर्ले : "हर घर तिरंगा" अभियान आणि स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने भाजपा सिंधुदुर्गच्यावतीने वेंगुर्लेत निवृत्त सैनिक सन्मान समारंभ दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथे देशभक्तीच्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमावेळी सभागृहात देशभक्तीपर गीतांचा निनाद होत होता, आणि उपस्थितांच्या चेहऱ्यावर अभिमानाची लखलख दिसत होती.

देशाच्या सीमा रक्षणासाठी, राष्ट्राच्या सन्मानासाठी आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या माजी सैनिकांच्या त्याग, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते १८ निवृत्त सैनिकांना शाल, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

यात माजी सैनिक समीर प्रभूखानोलकर, आनंद गावडे, संतोष चेंदवणकर, देवेंद्र लक्ष्मण गावडे, पुंडलिक द्वारकानाथ धरणे, प्रताप शिवराम राणे, विलास वासुदेव राणे, विक्रांत सुहास चुडजी,भगीरथ गोपाळ बागायतकर, दत्तराम गावडे, सुभाषचंद्र परब,  संतोष राणे, दिवाकर धुरी, जॅक डिसोझा, श्रीकांत कावले यांचा समावेश होता.

कार्यक्रमाला बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला चे प्राचार्य डॉ. बी. गोस्वामी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, भाजपा उद्योग आघाडी जिल्हा संयोजक सुधीर झाट्ये, शरद चव्हाण, तालुकाध्यक्ष विष्णु परब, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, सुहास गवडळकर, महीला मोर्चाच्या सुजाता पडवळ, वृंदा गवंडळकर, श्रेया मयेकर, आकांशा परब, वसंत तांडेल, साईप्रसाद नाईक, सुरेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. सचिन परुळकर यांनी केले.

या सन्मान सोहळ्यामुळे उपस्थितांमध्ये देशप्रेमाची भावना अधिक दृढ झाली आणि माजी सैनिकांच्या योगदानाचा अभिमान सर्वांच्या मनात पुन्हा उजळून निघाला. यावेळी खर्डेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते .