शाखा डाकपाल अनिल गावकर पोस्ट खात्यातून सेवानिवृत्त

Edited by:
Published on: November 24, 2023 18:45 PM
views 29  views

देवगड : आजच्या इंटरनेट युगात ग्रामीण भागात पोष्ट खात्याची विश्र्वासाहर्ता आजही दिसून येत आहे. अतिशय तुटपुंज्या पगारात पोष्ट खात्यात खाते बाह्य कर्मचारी म्हणून काम करत आपल्या कुटुंबाचा चरितार्थ सांभाळत गेली ४१ वर्षे अव्याहतपणे काम करणारे देवगड तालुक्यातील साळशी गावात शाखा डाकपाल अनिल गावकर हे गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी आपल्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांच्या गावकर कुटुंबीयांनी, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ आयोजित केला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. वैशाली सुतार या होत्या. यावेळी देवगडचे डाक निरीक्षक श्रीराम वायाळ, डाक आवेक्षक रविकांत लिंगायत, उपसरपंच कैलास गावकर, माजी पंचायत समिती सदस्य सुनील गावकर, माजी सरपंच अनिल पोकळे, वैभव साळसकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रभाकर साळसकर, आयनल पोष्ट मास्टर आनंद साटम, पोस्टमन सुनील घाडी, साळशी पोस्टमन संकेत कदम, कुवळे पोस्टमन सखाराम घाडी, गावकर यांचे ज्येष्ठ बंधू मानसिंग गावकर, कनिष्ठ बंधू तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय गावकर, सौ विद्या गावकर, माजी उपसरपंच राजेंद्र साटम, अनंत नाईक, पोलीस पाटील सौ. कामिनी नाईक, चंद्रकांत नाईक, विक्रांत नाईक, विलास राणे, सत्यवान कांडर, सत्कारमूर्ती अनिल गावकर, सौ. अर्चना गावकर, सुपुत्र डॉ. योगेश गावकर, युगंधरा गावकर, अभिषेक गावकर, सौ. ऐश्वर्या गावकर, वेदांत गावकर, विजय सुतार, पोस्टमन रमाकांत गावकर आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी देवगड चे डाक निरीक्षक श्रीराम वायाळ यांच्या हस्ते अनिल गावकर आणि सुविद्य पत्नी सौ. अर्चना गावकर यांचा शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला. तसेच साळशी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सौ. वैशाली सुतार, उपसरपंच कैलास गावकर यांनी शाल, श्रीफळ, भेट वस्तू देऊन सत्कार केला. यावेळी लोकमान्य मल्टिपर्पज बँक, अमर ज्योत युवक क्रीडा मंडळ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, हितचिंतकांनी, मित्रमंडळी, नातेवाईकांनी देखील त्यांना शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करत पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अनिल गावकर यांनी वयाच्या २४ व्या वर्षी अवघ्या १२० रू. मानधनावर २२ मार्च १९८२ रोजी साळशी गावात शाखा डाकपाल म्हणून पोष्ट खात्यात नोकरीला सुरुवात केली. तुटपुंजे मानधन असूनही कौटुंबिक जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी सांभाळत वेळेचे बंधन न पाळता त्यांनी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांशी, ग्रामस्थांशी सलोख्याचे, जिव्हाळ्याचे, विश्वासाचे नाते निर्माण केले. शिरगाव उपकार्यालयाशी कायमस्वरूपी समन्वय साधत आपल्या वरिष्ठांच्या आदेशाचे त्यांनी काटेकोरपणे पालन केले. याकामी त्यांना त्यांचे सहकारी कर्मचारी पोष्टमनचीही चांगली साथ मिळाली. त्याकाळी ग्रामीण अर्थव्यवस्था ही मनीऑर्डर वर अवलंबून असायची. शहरातील चाकरमान्यांच्या मनीऑर्डरवर ग्रामीण कुटुंबीयांचा मोठा आधार असायचा. गावातील वृध्द आईवडील, आजी आजोबा आस्थेने मनी ऑर्डर कडे डोळे लाऊन असायचे. दूर कोसावर वाडी वस्त्यात रहाणाऱ्या या वृद्ध आजी आजोबांना मनी ऑर्डरचा निरोप देण्याचे कामही गावकर यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्या प्रमाणे आपुलकीने केले. त्यामुळे गावकर यांचा ग्रामस्थ, ग्राहकांशी आजही तेव्हढाच जिव्हाळ्याचा , प्रेमाचा संबंध आहे. नोकरी संभाळत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे मोठे कार्य करत समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला. त्यांच्या या आदर्शाचा वारसा त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र डॉ. योगेश गावकर यांनी कृषी क्षेत्रात पी.एच.डी. प्राप्त केली. दुसरा मुलगा अभिषेक याने हॉटेल मॅनेजमेंट मध्ये यश मिळविले आहे.

आपल्या सत्काराला उत्तर देताना अनिल गावकर यांनी भाऊक होऊन सांगितले की ग्रामस्थ, ग्राहकांच्या सहकार्यामुळे मला काम करता आले. गाववाल्यांची आपुलकी, प्रेम हेच माझ्यासाठी मोठे आशीर्वाद आहेत. मी ते कधीच विसरू शकत नाही. डॉ. योगेश गावकर यानेही अतिशय भाऊक होत आपल्या वडिलांच्या प्रेमाखातर आलेल्या सर्वांचे विशेष आभार मानत आपणही आपल्या जीवनात वडिलांचा, काकांचा आदर्श घेऊन समाजासाठी काम करत राहणार. असे सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी सरपंच अनिल पोकळे, सूत्रसंचालन सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय गावकर यांनी तर आभार डॉ. योगेश गावकर यांनी मानले. यावेळी गावकर कुटुंबीयांनी सर्वांसाठी स्नेहभोजनचे आयोजन केले होते.