'बॉयकॉट दीपक भाई 2024'

ऐन दिवाळीत दोडामार्गात शिमगा
Edited by: संदीप देसाई
Published on: November 15, 2023 11:39 AM
views 79  views

दोडामार्ग : शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दोडामार्ग तालुक्यात अज्ञात व्यक्तींनी मंत्री केसरकर यांच्या नावाने थेट बॅनरबाजी करत त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. दोडामार्गमधील घसरलेली रुग्णसेवा व रोजगार, पर्यटन आणि विकास हे मुद्दे पकडून काहींनी दिवाळीत दीपक केसरकर यांच्या नावाने बॅनरबाजी करत शिमग्याचे वातावरण तयार केले आहे.


 मंगळवारी रात्री दोडामार्ग तालुक्यात शहरातील ग्रामीण रुग्णालय व मुख्य बाजारपेठ या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहेत. एका बॅनरचा आशय रामभरोसे तर दुसऱ्या बॅनरचा पंधरा वर्षापासून विकासापासून वंचित राहिला बाबतचे पत्र, असे मजकूर आहेत ' बॉयकॉट दीपक भाई 2024' असे सूचक विधानही या बॅनर वर नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे बुधवारचा उजाडलेली सकाळ दीपक भाईंच्या या बॅनरची बॅनर मुळे विशेष चर्चेची ठरत असून दोडामार्ग तालुक्यात ऐन दिवाळीत राजकीय ' शिमगा ' सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

   दोन ठिकाणीं लावलेल्या बॅनर मध्ये, भाई.. आपण १५ वर्षे आमदार, २ वेळा मंत्री आणि ४ वेळा ४ पक्ष बदलून देखील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देऊ शकत नाही अजून किती संधी द्यावी तुम्हाला? असा सवाल शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना विचारणारे बॅनर सद्यस्थितीत दोडामार्ग मध्ये झळकत आहेत. यात तुम्ही वरती चढत गेलात आणि प्रत्येक वेळा नवीन-नवीन, काय-काय सांगलात ता आमका पटत गेला. हत्तीच्या वेळा तसा, पूर ईलो तेव्हा तसा, शेतीचा नुकसान झाला तेव्हाही तसा, असा कित्येकदा झाला भाई आता पुरे, आता थांबा असाही संदेश त्यावर लिहिण्यात आला आहे.

१५ वर्ष विकासापासून वंचित रखलेलो एक दोडामार्गवालो अशा नावाने हे बॅनर दोडामार्ग येथे झळकत आहेत. २ ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहे. यात भाई दोडामार्ग रुग्णालयातील आरोग्य सेवा रामभरोसे, कंत्राटी डॉक्टरांनी दिला राजीनामा, गेली दोन महिने महिला प्रसूची कक्ष बंद "बायकॉट दीपक भाई" अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला आहे. दिवाळीच्या आदल्या दिवशी दीपक केसरकर यांनी आपण पुन्हा विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. काही जण मी खासदारकी लढवणार असल्याचे सांगून आपली बदनामी करत आहेत. मात्र काही झाले तरी आपण पुन्हा एकदा ही निवडणूक लढणार, असा दावा त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर केसरकर विरोधकांकडून हे बॅनर लागल्याची चर्चा आहे.