
चिपळूण : जागतिक पुस्तक दिनानिमित्त शिरळ येथील विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल पंचकोश गुरुकुलच्या वतीने दिनांक २३ आणि २४ एप्रिल २०२५ रोजी चिपळूण शहरातील सरस्वती शिशुमंदिर, प्रतीक आवास, चिपळूण येथे पुस्तक प्रदर्शनाबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक २३ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता ग्रंथपूजनाने प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक शशिकांत मोदी व डी.बी.जे. कॉलेजचे ग्रंथपाल डॉ. सुधीर मोरे उपस्थित राहणार आहेत. सदर दिवशी सायं. ०६ वाजता "वाचन - काल, आज आणि उद्या" या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादामध्ये शीलाताई केतकर (सेवानिवृत्त मुख्याध्यापिका), संकेत शेट्ये (जलसंधारण अधिकारी) , प्रा. डॉ. मीनल ओक (कृषी पर्यटन तज्ञ) सहभागी होणार आहेत.
दिनांक २४ एप्रिल रोजी सायं. ५.३० वाजता धीरज वाटेकर (लेखक व पर्यावरण तज्ञ), पुस्तक विक्रेते- व्यावसायिक मिलिंद पिंपुटकर यांची मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. सदर मुलाखत प्रा. सौ. संगीता जोशी घेणार आहेत. या मुलाखतीच्या कार्यक्रमानंतर सागर देशपांडे हे पालक, शिक्षक आणि वाचक जडणघडणाच्या दृष्टिकोनातून मांडणार आहेत.
'एका विद्यार्थ्यामागे सुमारे १०० पुस्तके असणारे ग्रंथालय' हे विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल पंचकोशाधारीत गुरुकुल शाळेत आहे. त्यातील विविध विषयांवरच्या व शालेय वयोगटाला उपयुक्त अशा पुस्तकांचे हे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनासाठी तसेच परिसंवाद आणि मुलाखतीसाठी सर्व चिपळूणकर आणि ग्रंथ व वाचनप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.