10 वी पास 'डॉक्टर' ! असा उठवला बाजार

मनोज रावराणे आक्रमक
Edited by: उमेश बुचडे
Published on: August 26, 2023 19:42 PM
views 463  views

कणकवली : फोंडाघाट परिसरात मागील काही वर्षांपासून स्वतः डॉक्टर असल्याचे सांगत फोंडाघाट ग्रामपंचायतीला खोटी कागदपत्रे सादर करून येथील रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीविताशी खेळणारा व कित्येकांना लाखो रुपयाचा गंडा घालणारा तथाकथित दहावी पास बोगस डॉक्टरचा कणकवली माजी सभापती मनोज रावराणे यांनी पर्दापाश केला केला.

      याबाबत सविस्तर वृत्त असे, सदरचा दहावी पास बोगस डॉक्टर हा मूळचा कोल्हापूर रंकाळा येथील असून एका मेडिकलमध्ये औषधे विक्रीचा अनुभव पाठीशी घेऊन दुसऱ्याच्या फर्मासिस्ट लायसनवर सुरुवातीला मेडिकल चालवणारा मात्र त्यात ही यश न आल्याने त्याने आपला मोर्चा फोंडाघाट गावाकडे वळवत  फोंडाघाट ग्रामपंचायत आणि येथील लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात धुळफेक करून मागील काही वर्षांपासून फोंडाघाट गांगोवाडी येथे राहून फोंडाघाट ,लोरे ,वाघेरी ,घोणसरी,हरकुळ व परिसरातील  रुग्णांवर वैद्यकीय उपचार करत होता.त्याच्या उपचारा दरम्यान कित्येकांना आराम पडण्याऐवजी इतर दुष्परिणामाना समोरे जावे लागले. किंबहुना घोणसरी येथील रुग्णाला आपला जीव गमवावा लागल्याचे वृत्त आहे  मात्र असे असूनही  याबाबत कोणीही कोठेही तक्रार केलेली नसल्याने आणि बोगस डॉक्टर  बोलण्यात पटाईत असल्याने त्यांच्यावर अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई झाली नव्हती तसेच या बोगस डॉक्टरने आपल्या रुग्णांकडून व इतर ओळखीच्या माणसांकडून लाखो रुपये जमा केले असून त्यांचे पैसे देण्याचे टाळाटाळ करत सध्या हे तथाकथित डॉक्टर सर्वांपासून लपून फिरत होते.

     दरम्यान लोरे येथील काही रुग्णांकडून या डॉक्टराने काही रक्कम घेऊन फसवणूक केल्याची माहिती कणकवली माजी सभापती मनोज रावराणे व  त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाल्यानंतर या डॉक्टरला पेशंट बनून कॉल केल्यावर आपल्याला नवीन शिकार भेटल्याने हा बोगस डॉक्टर लोरे नं. 1  येथे आल्यावर मनोज रावराणे आणि सहकाऱ्यांनी तो बोगस डॉक्टर असल्याचे कबूल करून घेत ज्यांची रक्कम त्याने घेतली होती ती परत करावयास लावली.