
वैभववाडी : कोकिसरे रेल्वे फाटकनजीक रेल्वे ट्रॅकवर मध्यप्रदेशातील मुकेशकुमार मुन्नालाल कोल (वय - २८) या तरुणाचा मृतदेह सापडून आला. हा प्रकार काल शुक्रवारी रात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास झाला. त्याला रेल्वेची धडक बसली कि त्याने आत्महत्या केली याबाबत कोणतीही माहीती समजु शकलेली नाही. मुकेशलाल हा कोकिसरे येथील एका सिमेंट गोदामामध्ये काम करीत होता. काल रात्री तो काम करीत असलेल्या ठिकाणावरून गायब झाला. दरम्यान, रात्री रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना एका अज्ञाताचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर दिसुन आला. रेल्वे सुरक्षा बलचे अधिकारी दुर्गेशप्रसाद यादव यांनी ही माहीती वैभववाडी पोलीसांना दिल्यानतंर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, पोलीस कर्मचारी हरेष जायभाय, अजय बिलपे, भगीरथ मौवळे आदी घटनास्थळी पोहोचले. त्यांना रेल्वे फाटकापासुन काही अतंरावर मृतदेह आढळुन आला. त्या मृताकडील आधारकार्डवरून त्याची ओळख पटली. पोलीसांनी येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह त्याच्या सहकाऱ्यांच्या ताब्यात दिला.