मोती तलावात घेता येणार बोटींगचा आनंद

बदकांचा आकार असलेल्या पॅडल बोटी दाखल
Edited by: विनायक गांवस
Published on: January 07, 2025 18:08 PM
views 535  views

सावंतवाडी : सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावाला आणखीन शोभा आणणाऱ्या बदकांचा आकार असलेल्या पॅडल बोटी दाखल झाल्या आहेत. चांदा ते बांदा या योजनेंतर्गत पर्यटन वृद्धीसाठी मोटर, स्पीडबोटसह बदकाचा आकार असलेल्या ६ मॅन्युअल बोटी दाखल झाल्यात. यामुळे सुंदरवाडी शहराच्या सुंदरतेत अधिक भर पडत असून माजी मंत्री आम. दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 




यामुळे बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावात बोटींगचा आनंद घेता येणार आहे. पर्यटकांसाठी हे खास आकर्षण असणार असून शहरवासीयांना देखील वेगळा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. चांदा ते बांदा योजनेतून पहिल्या टप्प्यात एक मोटर बोट व एक स्पीड बोट यापूर्वी दाखल झाली होती. आता यात मॅन्युअल पॅडल बोटी दाखल झाल्या असून दोन आसनी ३ व सहा आसनी ३ अशा ६ बोटींचा समावेश झाला आहे. माजी मंत्री तथा चांदा ते बांदा योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. श्री. केसरकर यांनी पर्यटनासाठी जाहीर केलेल्या पुरक उपक्रमांना देखील यामुळे चालना मिळणार आहे. या उपक्रमाच्या शुभारंभाची उत्सुकता सावंतवाडीकरांना लागली असून सायंकाळी अबालवृद्धांनी या बोटी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, चांदा ते बांदा योजनेतून या बोटी मंजूर करण्यात आल्या आहेत. लवकर या प्रकल्पाच लोकार्पण होणार आहे. पर्यटन वाढीसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असून बोटींग क्लब पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दिली.