
सावंतवाडी : रक्तदान हे जगातील सर्वात श्रेष्ठदान आहे. मात्र संविधान पूरक समतेसाठी थेंबा थेंबात भीमराव असणे ही काळाची गरज आहे. आज बाबासाहेबांचे समतेचे विचार हेच देशाला तारक आहेत. म्हणून समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी रक्तात 'भीमराव' हवे असल्याचे प्रतिपादन सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सावंतवाडीत केले. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समितीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन समारंभात तहसीलदार श्री. पाटील प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी विचारपीठावर पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल अवधूत, नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी वैभव अंधारे, प्रा. डॉ. देविदास बोर्डे, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, कोलगावचे माजी सरपंच लाडू जाधव, ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव, प्रा. रूपेश पाटील यांसह आंबेडकरी चळवळीतील तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व प्रतिमाना मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात श्री. पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रक्तदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या या एका रक्तदानाने एखाद्याला नवे जीवन मिळू शकते असे सांगून आपल्या रक्तात भीमरावही हवेत हे स्पष्ट करून समतेसाठी संविधान पूरक काम करणे आवश्यक असल्याचे त्याने स्पष्ट केले. भविष्यात वाचन, लेखन ,निबंध ,अशा विविध स्पर्धा आयोजकांनी आयोजित कराव्यात असे सांगून त्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य आपण करण्याची त्यांनी ग्वाही दिली. तसेच अशा स्पर्धातून उज्वल भावी नागरिक निर्माण होतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यानी निकोप समाजनिर्मितीसाठी सुदृढ समाजाची गरज असल्याने त्यासाठी अशा रक्तदानासारखे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे सांगून त्यांनी यावेळी स्वरचित भीम गीत सादर केले व बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी वैभव अंधारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल अवधूत यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केशव जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन शांताराम असनकर यांनी केले. या रक्तदान शिबिरात डॉ. श्रीमती बुवा, रक्तपेढीच्या श्रीमती बागेवाडी, श्रीमती रेडकर, रक्तपेढी कर्मचारी श्री. खाडे यांचेही मौलिक सहकार्य लाभले.यावेळी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समितीचे अध्यक्ष सौ. मीनाक्षी तेंडोलकर, उपाध्यक्ष जगदीश चव्हाण, सचिव अॅड. सगुण जाधव, कोषाध्यक्ष सुनील जाधव, विनायक जाधव, लाडू जाधव, लक्ष्मण निगुडकर, अनिल जाधव, कांता जाधव, सुरेश जाधव, गणपत जाधव, सिद्धार्थ जाधव, टिळाजी जाधव, नामदेव कदम, जयदेव जाधव, परेश जाधव, शांताराम असनकर, केशव जाधव, कविता निगुडकर, सत्वशीला बोर्डे, आदेश जाधव, सद्गुरू जाधव यांनी सदर शिबीर यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. दरम्यान यावेळी अनेक मान्यवरांनी शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
तहसीलदारांकडून रक्तदान !
यावेळी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी स्वतः उत्स्फूर्तपणे रक्तदान करून आदर्श घालून दिला. तसेच कार्यक्रमास उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. निखील अवधूत, सावंतवाडी नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी वैभव अंधारे, प्रसाद बटवाल यांनी देखील स्वतः रक्तदान करून समाजात रक्तदानाची किती गरज आहे, हे स्पष्ट केले. तसेच तब्बल 30 रक्तदात्यांनी रक्तदान करून आदर्श दानाचा परिचय करून दिला.
समन्वय समितीच्या वतीने सर्व रक्तदात्यांना अल्पोपहार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच अधिकारी वर्गांनी रक्तदान केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव यांनी त्यांचे विशेष आभार मानले.