श्री स्वामी समर्थ मठ घावनळे कासमळात रक्तदान शिबिर

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 23, 2024 13:06 PM
views 127  views

कुडाळ : तालुक्यातील श्री सद्गुरू स्वामी समर्थ जगदमाता मंडळ (परिवार) घावनळे, कासमळा येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे गुरुवर्य गुरुमाऊली आढावा ५१ वा वाढदिवस अभिष्टचिंतनाचा सोहळा सर्व भक्तगणांच्या उपस्थितीत संपन्न झाला.  यानिमित्त बुधवार १७ जुलै २०२४ रोजी सकाळी ७ वाजता अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ चर्म पादुकांवर अभिषेक व पादुका पूजन व पादुका दर्शन उपस्थित भक्तगणांनी घेतले. त्यानंतर सकाळी ११:३०वाजता स्वामींची महाआरती करण्यात आली.

दुपारी १२:०० वाजता अभिष्टचिंतन सोहळा गुरुवर्य माऊलींचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत व गुरुमाऊलींचे पाद्यपुजन, सेवेकऱ्यांकडून औक्षण करून गुरुवर्य माऊलींचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दुपारी १:०० वाजता महाप्रसाद संपन्न झाला. सायंकाळी ४ वाजता श्री स्वामी समर्थ जगदमाता परिवार यांचे नामस्मरण व त्यानंतर सायंकाळी ५ वाजता श्री देव वेतोबा प्रासादिक वारकरी भजन मंडळ मायनेवाडी-कोचरा यांचे वारकरी भजन व सायंकाळी ७ वाजता रामकृष्ण हरी भजन सेवा संघ पाट पंचक्रोशी बुवा आशिष सडेकर यांचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम व यानंतर रात्रौ ८ वाजता महाप्रसाद संपन्न झाला. श्री सद्द्गुरु स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ चर्म पादुकांचे दर्शन ह्या यादिवशी संपूर्ण दिवस खुले होते.

      सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणारी रक्ताची मागणी लक्षात घेता श्री सद्गुरू स्वामी समर्थ जगदमाता परिवार घावनळे कासमळा यांच्या कडून गुरुवार १८ जुलै रोजी रक्तदान, नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान या सहयोगी संस्थेच्या सहकार्य लाभले. या शिबिरास सर्व भक्तगणांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून या ईश्वराधिष्ठित कार्यात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात मोलाचे सहकार्य केले. सदर रक्तदान शिबिरासाठी ५२ रक्तदात्यांनी आपले बहुमूल्य असे रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना श्री सद्गुरू स्वामी समर्थ जगदमाता मंडळ घावनळे कासमळा यांच्याकडून पुष्प, श्रीफळ व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला तर्फे सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सदर रक्तदान शिबिरास उपस्थित असलेल्या सर्व आरोग्य सेवक, परिचारिका, डॉक्टर व एसएसपीएम रक्तपेढी चे कर्मचारी, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या उपस्थित सर्व सदस्यांचे मंडळातर्फे पुष्प व श्रीफळ देऊन गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आभार व्यक्त करण्यात आले. श्री सद्द्गुरु स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ चर्म पादुकांचे दर्शन उपस्थित सर्व भक्तगणांनी घेतले. मठाचे भक्तगण अमित चव्हाण यांनी सूत्रसंचालन व श्री स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष दादा गवस व गुरुवर्य गुरुमाऊली तसेच सर्व सेवेकरी यांनी सर्व कार्यक्रमांचे उत्तम नियोजन करून सदर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.