
सावंतवाडी : जगद्गुरू श्री रामानंदाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी तालुक्याच्यावतीने जानेवारी महिन्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत ४ जानेवारी रोजी इन्सुली - कोंडवाडा , ७ जानेवारी व्ही.पी.काॅलेज माडखोल, ११ जानेवारी मडूरे व आरोग्य केंद्र निरवडे आणि १८ जानेवारी रोजी विलवडे शाळा नंबर १ येथील सेवाकेंद्रांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
मानवी जीवन वाचवण्यासाठी रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, या माध्यमातून अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. समाजात रक्ताची वाढती गरज लक्षात घेता हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. सावंतवाडी तालुका अध्यक्ष राजेश पेडणेकर व सेवासमिती सावंतवाडी यांच्यावतीने सर्व नागरिकांना या रक्तदान शिबिरांना भेट देऊन उत्स्फूर्तपणे रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरुणांनी तसेच आरोग्यदृष्ट्या सक्षम नागरिकांनी पुढाकार घेऊन या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असेही आयोजकांनी नमूद केले आहे.
रक्तदानातून समाजहित साध्य होत असून, “तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या संदेशासह हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.










