कळसुलीत क्रशर, क्वारी विरोधात ग्रामस्थांनी केला रास्ता रोको

क्रशर व क्वारी बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 21, 2023 11:56 AM
views 393  views

कणकवली : कळसुली गावातील स्टोन क्रशर आणि काळ्या दगडांच्या क्वारीबाबत ग्रामस्थ आक्रमक झाले असून सोमवारी त्यांनी या प्रकरणी घोटगे फाटा येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. यासाठी कळसुली - शिवडावमधील ग्रामस्थ घोटगे फाटा येथे जमा झाले होते. त्यांनी दोन विना लायसन्स, विना ताडपत्री डंपर अडवले होते. मात्र पोलिसांनी धाव घेत मनाई आदेश असल्यामुळे आंदोलन न करण्याची विनंती केली. त्यामुळे ग्रामस्थांनी नियोजित आंदोलन रद्द केले. परंतू बेकायदेशीररित्या सुरु असलेले क्रशर व क्वारी बंद करण्याची जोरदार मागणी केली. ग्रामस्थांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी दिवसभरात सहा डंपरवर प्रत्येकी एक हजारप्रमाणे दंड केला.

कळसुली - शिवडाव ग्रामस्थांची यापूर्वी कणकवली प्रांताधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देत आंदोलन जाहीर केले होते. कळसुली गावातील स्टोन क्रशर आणि काळ्या दगडांच्या क्वारीच्या उडणाऱ्या धुळीमुळे फळबागांची वाट लागली आहे. बोअर ब्लास्टींगमुळे घरांना तडे जात आहेत. स्टोन क्रशरवरून वाहतूक करणारे डंपर भरधाव जात असल्याने वारंवार अपघात होतात. डंपरवर ताडपत्री घालत नाहीत. त्यामुळे पादचारी आणि इतर वाहनचालकांना त्रास होतो. अशा तक्रारी असून याचा नाहक त्रास आम्हा ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. ग्रामसभेत स्टोन क्रशर आणि क्वारी बंद करण्याबाबत ठराव करण्यात आला आहे. तरी हे क्रशर आणि क्वारी कायमस्वरुपी बंद करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. याच अनुषंगाने कळसूली- शिवडावमधील ग्रामस्थांनी घोटगे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन जाहीर केले होते. सोमवारी सकाळी ११.३० वा. च्या सुमारास ग्रामस्थ जमा झाले होते. ही बाब कणकवली पोलिसांना समजल्यानंतर पोलिस निरीक्षक अनिल जाधव, सहा. पोलिसनिरीक्षक सागर खंडागळे व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मनाई आदेश असल्यामुळे आंदोलन न करण्याची विनंती पोलिसांनी ग्रामस्थांना केली. या दरम्यान  ग्रामस्थांनी दोन विना लायसन्स डंपरही अडवले होते. ग्रामस्थांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांना निवेदन दिले. सरपंच सचिन पारधिये यांच्यासह कळसुली ग्रामस्थ उपस्थित होते. पोलिसांच्या विनंतीमुळे आंदोलन रद्द करण्यात आले मात्र कारवाईन झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

ग्रामस्थ गेल्यानंतरही पोलिस त्याठिकाणी थांबून होते. विना लायसन्स विना ताडपत्री सहा डंपरवर सायंकाळी दंडात्मक कारवाई करण्यात आली.