असलदेत काळ्या दगडाच्या खाणींना परवानगी नको

ग्रामसभेत ठराव ; प्रांत - तहसीलदारांना निवेदन
Edited by:
Published on: March 05, 2025 12:48 PM
views 192  views

कणकवली : तालुक्यातील असलदे गावात प्रदूषण निर्माण करणाऱ्या काळा दगडाच्या खाणींना परवानगी देण्यात येऊ नये असा ग्रामसभेत ठराव झालेला आहे. या ठरावानुसार गावात कोणालाही अशा खाणीसाठी परवानगी देण्यात येऊ नये अशी ग्रामसभेत झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी असलदे  ग्रामस्थांच्यावतीने कणकवली प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 


याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी सहित प्रांताधिकारी तहसीलदार यांनाही देण्यात आले आहे. असलदे गाव हा निसर्ग संपन्न असून त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात काजू लागवड झालेली आहे आणि त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न शेतकरी घेत आहे. गावात प्रदूषण होत नसल्याने प्रदूषणाने होणारे गंभीर दुष्परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावर गुराढोरांवर पशु पक्षांवर तसेच काजूच्या झाडावर होत नाही. पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही यासंदर्भात गावातील ग्रामस्थांनी प्रत्येक वर्षी सावधगिरीची भूमिका घेऊन ग्रामसभेच्या माध्यमातून आपले म्हणणे अधोरेखित केलेले आहे. 


असलदे  गावातील ग्रामस्थांनी 19 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये काळा दगडाच्या खणीला प्रखर विरोध करून स्टोन क्रेशरला परवानगी नाकारली.  तसा ठराव केला त्याचप्रमाणे 2017 पूर्वी ही गावात क्रेशर असता कामा नये असा ग्रामसभेत ठराव मंजूर झाला होता/ तसेच 27 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या ग्रामसभेत क्रेशर गावात सुरू झाल्यास कोणते दुष्परिणाम होऊ शकतात याबाबत चर्चा झाली आणि पुन्हा एकदा असले गावातील ग्रामस्थांनी गावात क्रेशर उभारणीस ग्रामपंचायतीने अजिबात मंजुरी देऊ नये म्हणून ठराव केला.

त्यामुळे ग्रामसभेत झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करून गावात कोणत्याही प्रकारे स्टोन क्रेशरला परवानगी देण्यात येऊ नये अशी आमची मागणी करण्यात आली आहे. यावेळी देवेंद्र लोके, श्यामसुंदर हडकर, सचिन लोके, सुरेश मिस्त्री, दिलीप डामरे, विजय डामरे, अविराज वरक, योगेश डामरे, अनिल नरे, लक्ष्मण लोके, सचिन हरमलकर, अनिल गंगाराम लोके, संजय जेठे, दया डगरे, मनोज मोहन लोके, सदाशिव घाडीगावकर, अनिल रामचंद्र लोके, राजू जेठे, रामचंद्र जेठे, आणि सर्व असलेले ग्रामस्थ उपस्थित होते.