भाजपच्या खारेपाटण जि.प.उमेदवार प्राची इस्वलकर बिनविरोध

ठाकरे सेनेला आणखीन एक धक्का
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 24, 2026 13:52 PM
views 154  views

 मीनल तळगावकर यांनी घेतली माघार

कणकवली : तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाकडून ठाकरे सेनेला सलग धक्के दिले जात आहेत. सलग दुसऱ्या दिवशी खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील ठाकरे सेनेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाच्या निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे या मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार प्राची इस्वलकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

या घडामोडींमुळे कणकवली तालुक्यात भाजपाकडून बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या ३ झाली असून, कणकवली विधानसभा मतदारसंघात ही संख्या एकूण ४ पोहोचली आहे. 

पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचे ‘दे धक्का तंत्र’ सध्या केवळ मतदार संघातच नव्हे, तर राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. मीनल तळगावकर यांच्या माघारीच्या निर्णयामुळे ठाकरे सेनेला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

विशेष म्हणजे शनिवार असूनही निवडणूक प्रक्रियेमुळे निवडणूक कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत आणखी कोण उमेदवार माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. कालच या मतदार संघातील अपक्ष उमेदवार उज्ज्वला चिके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर आज ठाकरे शिवसेनेच्या एकमेव विरोधी उमेदवार मीनल तळगावकर यांनीही माघार घेतल्याने प्राची इस्वलकर या या मतदार संघातील एकमेव उमेदवार राहिल्या. दरम्यान, ‘दे धक्का’ तंत्राचा मोठा फटका २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी बसण्याची शक्यता आहे.