
सावंतवाडी : तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून राणे समर्थक म्हणून परिचित असलेल्या भाजपचे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाने स्थानिक उमेदवाराला डावलून बाहेरचा उमेदवार लादल्याचा आरोप करत श्री. गावडे यांनी हे बंडाचे निशाण फडकवले आहे. यामुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तळवडे मतदारसंघात संदीप गावडे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे. निरवडे माजी सरपंच प्रमोद गावडेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर ते म्हणाले, या निवडणुकीत तळवडे, मळगाव, नेमळे आणि निरवडे यांसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या गावांतील सक्षम स्थानिक नेतृत्वावर अन्याय करण्यात आला आहे. या भागातील जनतेच्या भावनांचा विचार न करता बाहेरचा उमेदवार लादण्यात आल्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. हा अन्याय सहन न करण्याच्या भावनेतूनच आपण अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.











