जि. प. निवडणुकीत शेतकरी संघटनेने उतरविले १३ उमेदवार

काजू हमीभाव - वन्यप्राणी उपद्रव प्रश्नांवर लढणार
Edited by:
Published on: January 21, 2026 16:08 PM
views 152  views

बांदा : काजूला हमीभाव, पिक विमा संरक्षण आणि हत्ती, शेकरू, माकड, रानडुक्कर व गवारेड्यांचा वाढता उपद्रव तसेच फळबागांवरील किड-रोगांच्या समस्यांबाबत शासनाकडून दखल घेतली जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतःचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात तब्बल १३ उमेदवार शेतकरी संघटनेकडून रिंगणात उतरत असल्याची माहिती अध्यक्ष विलास सावंत यांनी कोकणसादला दिलीय.

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी संघटनांच्या माध्यमातून अर्ज, निवेदने, चर्चा व आंदोलने करून शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या प्रश्नांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.

जिल्हा परिषद निवडणुका हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तालुका व जिल्हास्तरावर मांडण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती हे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याने खऱ्या अर्थाने शेतकरी असलेला लोकप्रतिनिधी निवडून आल्यास समस्या मार्गी लागण्यास मदत होईल, असा विश्वास संघटने कडून व्यक्त  करण्यात आलाय.

 यासंदर्भात ४ जानेवारी रोजी बांदा येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली हॊती. या बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सक्षम शेतकरी उमेदवार देण्याचाही निर्णय एकमताने घेण्यात आला होता. त्यानुसार शेतकऱ्यांसाठी लढण्यास इच्छुक उमेदवार यांना संघटनेने पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

२०१८ पासून गोवा शासनाप्रमाणे काजूला किमान १५० ते १७० रुपये प्रति किलो आधारभूत किंमत मिळावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. मात्र मंत्रिमंडळ बैठकीत बाजारभाव ११० रुपये अधिक ४० रुपये अनुदान देऊन १५० रुपये दर निश्चित करण्यावर एकमत झाले होते. मात्र सावंतवाडी विधानसभा आमदार दीपक केसरकर यांनी केवळ दहा रुपये अनुदान देण्यावर आग्रह धरल्याने शेतकऱ्यांची निराशा झाल्याचेही सावंत यांनी म्हटलय. दरम्यान, गोवा शासनाने गेल्या वर्षी काजूला १७० रुपये प्रति किलो आधारभूत किंमत जाहीर केली आहे. त्याप्रमाणे हमीभाव मिळणे आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. 

तर नारळ बागायतदार शेकरू, केलडी व माकडांच्या उपद्रवामुळे त्रस्त असून नारळ फळांचे अतोनात नुकसान होते आहे. जाचक अटीनुसार फक्त ७ रु. भरपाई देऊन वनखाते व राज्यकर्ते क्रूर चेष्ठा करत असल्याचा शेतकरी यांचा आक्रोश आहे. तर वन्यप्राणी हत्ती आणि गवारेड्यांमुळे तसेच रानडुक्कर, सांबर, सालिंदर, शेकरू या प्राण्यांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मात्र यात शेकरू, सालिंदर या प्राण्यांचा नसलेला समावेश यामुळे नुकसानी होऊनही शेतकरी भरपाई पासून वंचित आहेत. तर ज्या पिकाला हिरवं सोनं म्हणून राज्य सरकार प्रेजेंट करतय त्या बांबू पिकाचा माकड, डुक्कर, हत्ती, मोर यांच्याकडून नुकसानी होऊनही हे पीक भरपाईच्या यादीतच नसल्याने किमान ६० ते ८० रु. प्रति बांबू नग शेतकरी नुकसानी सहन करत आहे. आज बाजारात नारळ ४० ते ६० रु. दराने मिळतं असताना फक्त ७ रु. भरपाई देऊन सरकार शेतकरी, बागायतदार यांची चेष्ठा करत आहे.

शिवाय २०२३ च्या बदलत्या हवामानामुळे काजू बागांवर किड-रोग वाढले असून काजू बागायतीतील आगी व वणवा हा नवा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

फळपीक विमा भरूनही आंबा व काजू बागायतदारांना नुकसान भरपाई वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. या परिस्थितीमुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे सांगण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्या साठी संघटनेने  सावंतवाडी-दोडामार्ग भागातून १३ शेतकरी उमेदवारांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपली तयारी दर्शविली. इतकच नव्हे तर थेट निवडणूक रनांगणात उतरून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शेतकरी संघटनेने कंबर कसत तब्बल १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. यात दोडामार्ग फळबागायतदार व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय देसाई हे त्या यादीत अग्रक्रमावर आहेत. अनेक शेतकऱ्यांनी निवडणुकीसाठी आर्थिक मदत देण्याची तयारीही काही शेतकरी मित्रांनी दर्शविली आहे. तर सिंधुदुर्ग फळबागायतदार व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत यांनीही बांदा जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह शेतकऱ्यांकडून करण्यात येत असून याबाबतही निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी म्हटलंय.