उद्यापासून भाजपच्या गाव चलो अभियानाची सुरुवात..!

Edited by: भरत केसरकर
Published on: February 03, 2024 13:52 PM
views 64  views

कुडाळ : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या संकल्पनेनुसार भारतातील सात लाख गावांमध्ये उद्यापासून गाव चलो अभियानाची सुरुवात होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९१७ बुथवार दिनांक ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने गावा चलो अभियान राबविण्यात येणार आहे. 

या अभियानाची माहिती व प्रशिक्षण देण्याकरता जिल्हा व मंडल स्तरावर पक्षाच्या वतीने कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक बुध वर एक प्रवासी कार्यकर्ता संपूर्ण दिवस प्रवास करणार असून या प्रवासादरम्यान गावातील विविध घटकांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. यामध्ये गावातील प्रभावशाली व्यक्ती, नव मतदार, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, जनसंघापासून काम करणारे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी, गावातील शासकीय कर्मचारी व इतर घटकांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधणार आहे.

याच प्रवासादरम्यान भारतीय जनता पक्षाच्या बूथ समितीची बैठक घेऊन पक्षीय कामकाजाचा आढावा घेण्यात येणार असून आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष यांना किमान ६० टक्के मतदान होण्याच्या दृष्टीने विचार विनिमय व व्युहरचना करणार आहे. या अभियानाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक बुथनिहाय प्रवासाचे नियोजन पूर्ण झालेले असून उद्या दिनांक ४ फेब्रुवारी पासून ते ११ फेब्रुवारी पर्यंत टप्प्याटप्प्याने प्रत्येक गावामध्ये एक कार्यकर्ता पोहोचणार आहे.

या अभियानामध्ये पक्षाचे राज्य व जिल्हास्तरीय प्रमुख नेते व पदाधिकारी देखील सहभागी होणार आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, लोकसभा मतदारसंघ संयोजक प्रमोद जठार, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे व प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने पक्षाने आयोजित केलेल्या या अभियानामुळे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून हे अभियान सर्व प्रवासी कार्यकर्ते पूर्ण करतील असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व या अभियानाचे जिल्हा संयोजक रणजित देसाई यांनी व्यक्त केला आहे.

दिनांक ११ फेब्रुवारी रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनी या अभियानाची सांगता होणार आहे. गाव चलो अभियानामुळे समाजातील सर्व घटक हे भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांशी जोडले जावे याकरता देखील प्रयत्न करण्यात येणार आहेत.