
कुडाळ : भाजपच्या वतीने शुक्रवारी कुडाळ येथे संविधान समर्थनार्थ रॅली काढण्यात येणार आहे. भाजप कार्यालय ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळापर्यंत रॅली काढण्यात येईल. आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केली आहे. या चौकशीच्या विरोधात आमदार वैभव नाईक यांनी मोर्चा काढला होता. हा मोर्चा म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाचा अवमान आहे, असा भाजपचा आरोप आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने संविधानाच्या समर्थनार्थ शुक्रवारी सकाळी दहा वाजता रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये मुंबई बँकेचे अध्यक्ष व माजी विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, भाजप प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी असणार आहेत
आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथे काढलेल्या मोर्चात राणी कुटुंबीयांवर जोरदार टीका करण्यात आली होती. या टीकेला या सभेतून कसे प्रत्युत्तर देण्यात येते याची जिल्ह्याला उत्सुकता लागून आहे.