भाजप युवा मोर्चाने पालकमंत्री रविंद्र चव्हाणांचे विविध प्रश्नांवर वेधले लक्ष

तातडीने कार्यवाहीचं पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचं आश्वासन !
Edited by: दीपेश परब
Published on: November 05, 2022 21:01 PM
views 141  views

वेंगुर्ले : येथील रेडी ते रेवस सागरी महामार्गावरील उभादंडा ते शिरोडा रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत तसेच उभादांडा सागरेश्वर किनाऱ्यावरील पर्यटन विकास महामंडळ विभागामार्फत उभारण्यात आलेल्या वुडन अँड  हाऊस प्रकल्पाची चौकशी करण्याबाबत प्रश्नांवर भाजप युवा मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात आले. याबाबत त्यांना निवेदन सादर करण्यात आले.

सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजप युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हितेश धुरी, जिल्हा चिटणीस तथा परबवाडा उपसरपंच हेमंत गावडे, जिल्हा चिटणीस तुषार साळगावकर, भूषण आंगचेकर, मारुती दोडशनट्टी यांनी भेट घेऊन वेंगुर्ला तालुक्यातील विविध प्रश्नांवर लक्ष वेधले.

रेडी रेवस हा सागरी महामार्ग असून उभादांडा ते रेडी रस्ता संपूर्णपणे खड्डेमय झालेला आहे. त्याचा सर्वसामान्य नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  या रस्त्याची झालेली दुर्दशा व गंभीर परिस्थीती बघता प्रत्येक नागरिक, शाळकरी मुले, दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहतूक प्रवास करताना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अपघातांची मालिका सुरु झालेली आहे. रस्त्याची देखभाल दुरुस्ती, डांबरीकरण व नूतनीकरणाची सर्वस्वी जबाबदारी बांधकाम उपविभागीय अधिकारी यांच्यावर राज्य शासनाने निश्चित केलेली आहे. या रस्त्याबाबत ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनीधी व नागरिकांनी प्रत्यक्ष तसेच लेखी स्वरुपात रस्ता दुरुस्ती डांबरीकरण व नूतनीकरणाची वेळोवेळी मागणी करून सुद्धा बांधकाम विभागाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही.

तसेच उभादांडा सागरेश्वर येथील महाराष्ट्र पर्यटन विभागामार्फत उभारण्यात आलेला वूडन अॅण्ड हाऊस प्रकल्प गेली पाच वर्ष धूळ खात पडला आहे. लाखो रुपये खर्च करून सदरचा प्रकल्प उभा करण्यात आला. त्यातील काही तंबू हे समुद्राच्या लाटांत पाण्यासोबत वाहून गेले. व उर्वरित प्रकल्प महाराष्ट्र पर्यटन विभाग यांच्या दुर्लक्षतेमुळे धूळ खात पडलेला आहे. सदर प्रकल्पाची चौकशी होवून संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई होऊन प्रकल्प सुसज्ज असा पर्यटनात्मक उद्देशाने सुरु करण्यात यावा. उभादांडा गाव हा पर्यटनात्मक दृष्टीने व शहराच्या लगत असल्यामुळे पर्यटनदृष्ट्या सदर गावाचा विकास व रोजगाराच्या संधी गावात उपलब्द्द व्हायला हव्यात. सर्व गंभीर बाबींचा विचार करुन आपल्याकडून योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

    दरम्यान, याबाबत तात्काळ अधिकाऱ्यांना सूचना करून कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.