आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजप महाविजय प्राप्त करेल : आ. श्रीकांत भारतीय

Edited by: विनायक गावस
Published on: November 18, 2023 19:28 PM
views 54  views

सावंतवाडी : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली असून २०२४ ला पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपा महाविजय प्राप्त करेल, असा दावा भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. श्रीकांत भारतीय यांनी  केला. दरम्यान, राज्यात युतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही निवडणूकींना सामोरे जाणार आहोत. मात्र, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

      भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रणजीत देसाई, महिला संघटक श्वेता कोरगावरकर आदी उपस्थित होते.

      आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या तयारीसाठी प्रत्येक मतदार संघामध्ये पदाधिकारी व  कार्यकर्ते तसेच थेट जनतेशी संवाद साधणे हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शिवाय नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेले सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी संवाद साधून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून गावागावांमध्ये कशी तयारी करावी याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे, असे ते म्हणाले.

    सद्यस्थितीत भारतीय जनता पार्टी कडून राज्यातील २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा जागांवर लोकसभेसाठी आवश्यक ती तयारी करून घेतली जात आहे ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर काहीसा आत्मविश्वासही पदाधिकारी कार्यकर्त्यांचा वाढला आहे या आत्मविश्वासाच्या जोरावर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजप पुन्हा एकदा सत्ता काबीज करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

       राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिघांच्या माध्यमातून एकत्रित निवडणूकांना आम्ही सामोरे जाणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही निवडणुका लढवल्या जाणार आहेत. मात्र, कुठच्या मतदारसंघाची जागा कुठल्या पक्षाला आणि कोणाला द्यायची हे येणारी वेळच ठरवणार आहे. यापूर्वीही भाजप शिवसेनेसोबत काम करत होता त्यामुळे जागावाटप हे भाजपासाठी नवखे नाही त्यामुळे आत्ताच याबाबत बोलणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

      मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. परंतु जरांगे पाटील यांच्या मागे बोलविता धनी वेगळाच असल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. ते असे का म्हणाले हे माहित नाही परंतु असे वक्तव्य केल्याने समाजामध्ये वाद निर्माण होऊ शकतात त्यामुळे प्रत्येक पक्षातील नेत्यांनी बोलताना काळजी घेणे गरजेचे आहे.

      विकास ही प्रक्रिया आहे त्यामुळे विकासामुळे कोणीही समाधानी नसावे तरच विकासाची प्रक्रिया ही निरंतर सुरू राहते. जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास २००२ च्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास नक्कीच मागे राहिलेला नाही. तर सावंतवाडी रेल्वे टर्मिनस च्या अडचणी संदर्भात मार्ग काढण्याबाबत आपण नक्कीच प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.


मुख्यमंत्री म्हणून फडणवीसच हवेत..

राज्यात युतीच्या माध्यमातून काम करत असतांना प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांला त्यांचा नेता मुख्यमंत्री असावा अशी इच्छा असते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असावेत अशी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असेही आ. श्रीकांत भारतीय म्हणाले. मात्र, असे असले तरीही आगामी निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.