...तर प्रभाकर सावंतांचा ठाकरे सेना सत्कार करेल !

अमरसेन सावंत यांचा टोला !
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 01, 2024 13:04 PM
views 361  views

सिंधुदुर्गनगरी : काजू उत्पादन अनुदानाच्या शासननिर्णयात त्रुटी असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मंगळवारी काजू शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन केले. मात्र भाजप पक्ष शेतकऱ्यांच्या विरोधात असल्यामुळेच भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी या आंदोलनावर टीका केली आहे. काजू अनुदानाचा लाभ सरसकट शेतकऱ्यांना मिळू नये यासाठीच सरकारने शासन निर्णयात जाचक अटी ठेवल्या आहेत. या जाचक अटी रद्द न झाल्यास या अनुदानास शेतकरी पात्र होणार नाहीत यावर शिवसेनेने आवाज उठविल्यानंतर आता भाजपला जाग आली आहे. शिवसेनेचे आंदोलन खोटे आणि  राज्य सरकारने घेतलेला शासन निर्णय योग्य असेल तर येणाऱ्या १५ दिवसांत भाजप जिल्हाध्यक्षांनी या शासन निर्णयाप्रमाणे शेतकऱ्यांना काजूचे प्रतिकिलो १० रुपये अनुदान मिळवून द्यावे तसे झाल्यास शिवसेनेच्या वतीने भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा आम्ही सत्कार करू असे प्रत्युत्तर शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी दिले आहे. 

अमरसेन सावंत म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर सरकारने काजू शेतकऱ्यांची  दिशाभूल करून मते मिळविण्यासाठी तुटपुंज्या अनुदानाचा  शासन निर्णय काढला आहे. मोठ्या प्रमाणात काजूचे जेव्हा उत्पादन असते तेव्हा प्रतिकिलो १०५ ते ११० रु. दर देण्यात आला होता. आता १८० रु. दर आहे म्हणजे जवळपास शेतकऱ्यांचे प्रतिकिलो ७० रुपयांचे नुकसान झाले आहे. हमीभाव देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत सरकारने केवळ १० रु अनुदान जाहीर करून शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. जाचक अटी लावून हे अनुदान सरसकट शेतकऱ्यांना मिळू नये याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अशी टीका अमरसेन सावंत यांनी केली.