
दोडामार्ग : नगरसेवक संतोष नानचे यांनी फक्त पैसा व सत्ता यांच्या जोरावर आम्हाला आमच्या आईसह बेघर केले आहे. त्यामुळे एखाद्या वाईट प्रवृत्तीची व्यक्ती जर समाजातील वाईट प्रवृत्तीवर टीका करत असेल तर हेच हास्यास्पद आहे. "सौ चूहे खाके, बिल्ली चली हज को" या म्हणीप्रमाणे संतोष नानचे यांचे वर्तन असल्याचा गंभीर आरोप युवासेना (शिंदे गट) शहरप्रमुख गोकुळदास बोंद्रे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
नगरसेवक संतोष नानचे यांनी पत्रकार परिषदेत युवासेना (शिंदे गट) शहरप्रमुख गोकुळदास बोंद्रे व भाजपा माजी शहराध्यक्ष समीर रेडकर यांचे नाव न घेता टीका केला होता. याला गोकुळदास बोंद्रे यांनी प्रत्युत्तर दिले. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे आमच्या कौटुंबिक वादातुन आम्हाला आमच्या आईसह फक्त पैसा व सत्ता यांच्या जोरावर नगरसेवक संतोष नानचे यांनी बेघर केलेले आहे. अशा व्यक्तीला अपात्रता प्रकरणात खास. नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे व भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे सहकार्य लाभणे म्हणजे भविष्यात नानचे यांच्या अपप्रवृत्तीला खतपाणी खालण्यासारखेच आहे. मात्र, आमच्या कौटुंबिक वादातील न्यायालयीन लढ्यात या महनीय व्यक्तींनीच नानचे यांना सहकार्य करण्याची दाट शक्यता आहे.
मागील चार वर्षांपासुन मला माझ्या आईसह त्रास देणाऱ्या नानचे यांनी माझ्या घराची करून ठेवलेली परिस्थिती भाजपच्या नेत्यांनी प्रत्यक्ष येवुन पहाणी करण्याची गरज आहे आणि नंतरच नानचे नामक अशा या थोर व्यक्तीला सहकार्य करावे. आम्हाला बेघर केल्यापासुन माझी आई मानसिक खच्चीकरणामुळे अंथरुणाला खिळून असून यास नानचेच जबाबदार असल्याचा आरोप बोंद्रे यांनी केला आहे.
माझ्या आईच्या जिवितास धोका निर्माण झाला असून तिचे काही बरे वाईट झाल्यास तिचा मृतदेह अंत्योदय तत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या व नानचे यांना सहकार्य करणाऱ्या भाजपाचे नेते खा. नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आ. नितेश राणे, माजी खा. निलेश राणे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या दारी फिरवण्याशिवाय मला पर्याय उरणार नाही. संतोष नानचे यांनी पैसा व सत्ता यांच्या जोरावर दोडामार्ग तालुक्यातील अडाणी लोकांच्या जमीन बळकावलेल्या प्रकरणांची माहिती घ्यावी व नंतरच भाजपच्या अशा थोर विद्यमान नगरसेवक यांची बाजू घ्यावी असा टोलाही लगावला.