किरण सामंतांना जनता नक्कीच विधानसभेत पाठवेल : रवींद्र चव्हाण

Edited by: मनोज पवार
Published on: November 07, 2024 20:19 PM
views 158  views

राजापूर : महायुतीच्या सत्ता काळात मोठया प्रमाणावर विकास कामे मार्गी लागली. अनेक योजना जनतेपर्यंत पोहोचल्या. लाडकी बहीण योजना असेल किसान सन्मान योजना असेल किंवा अन्य योजना असतील थेट जनतेपर्यंत त्या पोहोचल्या. कोकणातील विकास कामांसाठी सुमारे साडेपाच हजार कोटीचा निधी दिला. जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनच्या विकासाची कामे पार पडली. सगळीकडे विकास कामे होत असतानाच  विकासाच्या दृष्टिकोनातून राजापूर विधानसभा मतदार संघ मागे पडला असून  येथे चांगला उमेदवार असावा या प्रतीक्षेत आम्ही होतो. तसा उमेदवार किरण सामंत यांच्या रूपात लाभला असून येथील सुज्ञ मतदार त्यांना विजय करून विधानसभेत निश्चितच  पाठवतील असा जोरदार विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ओणी  येथे महायुतीच्या मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला.

  ओणी येथील श्री गजानन मंगल कार्यालयात गुरुवारी महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी महायुतीच्या नेत्याने  उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या सत्ता काळात मार्गी लागलेल्या विविध योजनांचा आणि विकास कामांचा आढावा सादर केला. त्याच वेळी विरोधकांचा खरपूस समाचार देखील घेतला. सदर प्रसंगी व्यासपीठावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री  ना. रवींद्र चव्हाण, राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री  ना. उदय सामंत, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपचे जिल्हाध्यक्ष  राजेश सावंत, राष्ट्रवादीचे  ( अजित पवार पक्ष ) जिल्हाध्यक्ष बंटी वणजू, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, भाजपचे ज्येष्ठ नेते राजन देसाई, अतुल काळसेकर  यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला असून लोकसभा निवडणुकीत ते मतदारांनी सिद्ध केले आहे. आणि या विधानसभा निवडणुकीत सुध्दा कोकणातील मतदार महायुतीच्या पाठीशी पुन्हा एकदा ठामपणे उभा राहील असा विश्वास ना. चव्हाण यांनी व्यक्त केला. महायुतीच्या सत्ता काळात आम्ही अनेक निर्णय घेतले. योजना आणल्या आणि यशस्वी पणे राबविल्या. आणलेल्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचल्या. मग ती लाडकी बहीण योजना असेल. किसान सन्मान योजना असेल प्रत्येक योजना लोकाभिमुख ठरली. समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न झाला.शासनाच्या माध्यमातून भरघोस निधी आणला आणि त्यातून विकास कामे मार्गी लागल्याचे ना. चव्हाण पुढे बोलताना म्हणाले. आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून देखील साडेपाच हजार कोटी रुपयांचा निधी दिला त्यातून रत्नागिरी जिल्ह्यातील रेल्वेस्टेशनसह विकास कामे मार्गी लागल्याचे ते म्हणाले. मात्र राजापूर विधानसभा मतदार संघ विकासाच्या दृष्टीकोनातून मागे पडला होता. त्याला आता विकासाच्या मार्गावर आणायचे असेल तर चांगल्या उमेदवाराची प्रतीक्षा होती. किरण सामंत यांच्या रूपाने आम्हाला चांगला उमेदवार मिळाला आहे.महायुतीचे कार्यकर्ते किरण सामंत यांचा जोमाने प्रचार करतील आणि त्यांना विजयी करतील असा आशावाद ना. चव्हाण यांनी व्यक्त केला. उपस्थित महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सूचना दिल्या. शासनाच्या योजना मतदारां पर्यंत न्या..असे सांगताना प्रत्येक बूथवर ७० टक्के मतदान मिळाले पाहिजे तसे नियोजन करा असे आवाहन त्यांनी केले. पुढील काही दिवस महत्वाचे असून विरोधक भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न करतील. दिशाभूल करतील त्याला बळी पडू नका. असे आवाहन ना. चव्हाण यांनी केले.

महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्या खास प्रचारासाठी ठाण्यावरून आलेल्या खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. मागील सव्वा दोन वर्षात आम्ही केलेली विकास कामे असतील किंवा यशस्वी राबविलेल्या योजना असतील त्या आम्ही आम्ही सांगतो. तुम्हीअडीज वर्षात काय केलेत ते समोर येऊन सांगा असे आव्हान डॉ शिंदे यांनी दिले. अडीज वर्षाच्या सत्ता काळात ज्यांनी स्वतः सह राज्याला बंद केले होते असा खोचक टोला त्यांनी लगावला.केंद्रासहर्याण राज्यात डबल इंजनचे सरकार आहे. राज्यात एक लाख सतरा हजार कोटीची गुंतवणूक आली आहे. असे डॉ शिंदे यांनी सांगितले. कोकणात पर्यावरण पूरक असे प्रकल्प आले पाहिजेत असे त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. नाणार येथील रद्द झालेल्या रिफायनरी प्रकल्पाला ज्यांनी मुख्यमंत्री असताना बारसू गावात आणला . बारसूत तो प्रकल्प व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आणि जागा सुचविली तेच आता रिफायनरी विरोधात भूमिका घेत असल्याची जोरदार टीका ना सामंत यांनी केली. मागील पंधरा वर्षात राजापूरचा विकास झाला नाही. मात्र येथील विकास कामे मार्गी लागावीत म्हणून आपले बंधू आणि महायुतीचे उमेदवार किरण सामंत सातत्याने प्रयत्न केले. महामार्गावरील वाटुळ येथील मंजूर झालेले मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल असेल किंवा लांजा रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात होणारे रूपांतर असेल हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी किरण सामंत यांचा मोठा वाटा आहे. अशा शब्दात त्यांनी किरण सामंत यांचे कौतुक केले. या मतदारसंघात सकारात्मक काम करणारा लोकप्रतिनिधी हवा असून किरण सामंत हे आमदार म्हणून निवडून येतील असा जोरदार विश्वास ना. सामंत यांनी व्यक्त केला. जर स्थानिक लोकांचा विरोध असेल तर कोणताही प्रकल्प लादणार नाही. इकडची बेरोजगारी दूर करण्यासाठी चांगले प्रकल्प निश्चितच आणले जातील याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खास कोल्हापूर वरून आलेले हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्या कार्यपद्धतीचा गौरव केला. आपल्या जोरदार भाषणादरम्यान त्यांनी  विरोधकांचा खरपूस समाचार घेतला किरण सामंत यांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार यांचेही गुवाहाटीचे तिकीट काढलेले होते तापी गाडीत बसता बसता ते थांबले असा खळबळ जनक आरोप त्यांनी कोणाचे नाव न घेता केला. मात्र त्यांचा रोख कोणाकडे होता ते उपस्थितांच्या  लक्षात आले आणि सभागृहात खसखस पिकली. महायुतीच्या शासनाने यशस्वी राबवलेली लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरेल  आणि राज्यात महायुतीची पुन्हा सत्ता येईल असे खासदार धैर्यशील माने यांनी ठासून सांगितले. राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या आशेचा किरण हे भैया उर्फ किरण सामंत असून ते निश्चितच विजय होतील असा विश्वास खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला.

राजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी मार्गदर्शन करताना या विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिली. महायुतीच्या पार पडलेल्या मेळाव्याला चांगली उपस्थिती लाभली होती.