भाजप - शिवसेना नगरसेवकांकडून राणेंच्या विजयाचा विश्वास

शहरात महायुतीकडून प्रचारात आघाडी
Edited by: विनायक गांवस
Published on: April 29, 2024 12:41 PM
views 200  views

सावंतवाडी : भाजप महायुतीचे लोकसभेचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सावंतवाडी  शहरातून सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याचा निर्धार महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केला. सावंतवाडी शहरातील प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. येथील भाजपचे नगरसेवक आनंद नेवगी व शिवसेनेच्या नगरसेविका शुभांगी सुकी यांनी प्रचारात पुढाकार घेत विजयाचा विश्वास व्यक्त केला.

महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचारावर भर दिला आहे. सावंतवाडी शहरात भाजपचे निर्विवाद वर्चस्व असून शहरातून मंत्री राणे यांना 90 टक्के मतदान देण्यात येणार आहे. यासाठी नियोजनपूर्वक प्रचार यंत्रणा राबविण्यात येत असून शहरात घरोघरी प्रचारावर भर देण्यात आला आहे असं मत माजी नगरसेवक आनंद नेवगी यांनी व्यक्त केले. तर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून झालेला विकास व जनतेसाठी महायुतीन केलेली कामं पहाता राणेंना मोठं मताधिक्य शहरात मिळेल असं मत शिवसेना माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांनी व्यक्त केले.

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी सावंतवाडी शहरातून नारायण राणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहचविण्यात येत असून याचा फायदा निश्चितच महायुतीचे उमेदवार राणे यांना मिळणार असल्याच मत युवा नेते विशाल परब यांनी यावेळी व्यक्त केल. याप्रसंगी माजी नगरसेवक आनंद नेवगी, शुभांगी सुकी, महेश सुकी, मनोज नाईक, विराग मडकईकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.