भाजप निवडणूका घेण्यास घाबरत आहे : हरी खोबरेकर

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: August 07, 2023 17:17 PM
views 124  views

मालवण : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाबद्दल संपूर्ण देशाने कौतुक केले आहे आणि भविष्यातील निवडणुकांमध्येही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येणार असल्याचे निश्चीत असल्यानेच भाजप निवडणूका घेण्यास घाबरत आहे, असा टोला ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत लगावला. 

शिवाय राणे बंधुनी स्वत:ला लगाम लावला नाही तर त्यांना ठाकरे शिवसेनेच्यावतीने रस्त्यावर उतरून योग्य तो धडा शिकवीला जाईल असा इशाराही श्री. खोबरेकर यांनी यावेळी दिला. 

ठाकरे गटाच्या तालुका कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, सन्मेष परब, हेमंत मोंडकर, उमेश चव्हाण, सिद्धेश मांजरेकर, प्रविण लुडबे, दत्ता पोईपकर, अक्षय भोसले, गौरव वेर्लेकर आदी उपस्थित होते.

श्री. खोबरेकर म्हणाले, महागाई, बेरोजगारी, बंद होत असलेले उद्योगधंदे यावर कधीतरी राणे बंधुनी भाष्य करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोडवे गाऊन जनतेच्या समस्या सुटणार नाहीत. जनतेला अभिप्रेत असलेले काम आजही भाजपकडून होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे राणे बंधुनी शासनकर्त्यांवर टीका करण्याचे धाडस दाखवावे. जनतेच्या मनात भाजपबद्दल प्रचंड रोष असल्याने निवडणूका कधीही लागल्या तरी जनता भाजपला घरीच बसविणार आहे. नुकताच मालवणात माजी नगरसेवकांनी केलेला पक्षप्रवेश म्हणजे शिवसेनेवर कितीही आघात केलात तरी पक्ष संघटना किती मजबूत आणि सक्षमपणे उभी आहे हेच दिसून आले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. 

निलेश राणे यांना मालवण कुडाळ मतदार संघातील रस्त्यातील खड्डा शोधण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागली होती. मात्र कणकवली मतदार संघातील देवगड आणि वैभववाडी याठिकाणी त्यांनी जर फेरफटका मारला तर त्यांना खड्डे कसे असतात हे काही मीटर फिरल्यानंतरच दिसून येतील. यामुळे त्यांनी आधी आपल्या बंधुराजांच्या मतदार संघातील खड्ड्यांकडे लक्ष द्यावे आणि नंतरच आमदार वैभव नाईक यांच्या मतदार संघातील कामांकडे पाहावे, असा टोला श्री. खोबरेकर यांनी लगावला.

माजी मुख्यमंत्री राहिलेल्या नारायण राणे यांना मालवण कुडाळ मतदार संघातील जनतेने घरी बसविले होते. राणे दुसऱ्यांना पाठच्या दाराचा आमदार म्हणून हिणवत होते, मात्र आता त्यांच्यावरच पाठच्या दाराने मंत्री होण्याची वेळ आली आहे. माजी खासदार निलेश राणे यांना दोनदा पराभूत व्हावे लागले आहे. यामुळे राणे कुटुंबियांनी पराभवातून काहीतरी बोध घ्यावा, असा टोला श्री. खोबरेकर यांनी मारला. आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत हे दोघेही तिसऱ्यांदा विजयी होतील असा विश्वासही खोबरेकर यांनी व्यक्त केला.