भाजप समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष : खा. अशोक नेते

Edited by: उमेश बुचडे
Published on: May 02, 2024 11:20 AM
views 81  views

कणकवली : भाजप हा समाजातील सर्व घटकांनासोबत घेऊन जाणारा पक्ष आहे.आदिवासी, दलित, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्वांना सोबत घेवून चालतो.आणि म्हणूनच देशाच्या सर्वाच्चप असलेल्या राष्ट्रपतीपदी ए. पी. जे.अब्दूल कलाम ,रामनाथ कोविंद, द्रौपदी मुर्मू यांना विराजमान केले. मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा प्रश्न काँग्रेसने खितपत ठेवला होता. मात्र, महाराष्ट्रात देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी इंदू मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक उभारण्याचा प्रश्न मार्गी लावला. आदिवासीचे दैवत बिरसा मुंडा यांचा जन्म दिवस १५ नोव्हेंबर हा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला.भाजप पक्ष हा विकासाचे राजकारण करतो तर विरोधक हे मतांचे राजकारण करतात, असा आरोप करतानाच रत्नागिरी सिंधुदुर्गसहीत राज्यातील ४० हून अधिक जागा आम्ही जिंकू, असा विश्वास भाजपच्या एसटी मोर्चा विभागाचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते यांनी केला. येथील प्रहार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत नेते बोलत होते.

यावेळी भाजपच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष बाबूराव कोहाळे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, आरपीआयचे आठवले गटाचे प्रदेश सहसचिव रमाकांत जाधव, आरपीआय जिल्हाध्यक्ष अजित कदम, भाजपच्या एससी-एसटीचे सेलचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव,भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ,रुपेश राऊत, मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, तालुकाप्रमुख भूषण परूळेकर, सुनील पारकर आदी उपस्थित होते.

 इंडिया आघाडीतील काँग्रेससह घटक पक्षांना पराभव दिसू लागला आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. यामुळेच त्यांनी विकासाचे मुद्दे सोडून जाती जातीत भांडणे लावण्याचे काम सुरू केले आहे. तोडा, फोडा व राज्य करा आणि मतांचे राजकारण हा काँग्रेसचा अजेंडा आहे. सत्तेत असताना काँग्रेसने देशात विकासात्मक काम व देश हिताचे निर्णय घेतले नाहीत. मागील १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने सर्वसमावेशक निर्णय घेऊन देशाचा कायापालट केला. 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विजय पक्का आहे. या मतदारसंघातील महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नसून पक्षाचे सर्वनेते पदाधिकारी, कार्यकर्ते राणेंच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत, असेही श्री. नेते म्हणाले. केंद्रात भाजप व त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार पुन्हा आल्यास राज्यघटना बदलण्यात येईल, असा अपप्रचार इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडून केला जात आहे. मागील १० वर्षांत केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राज्यघटनेत कोणताही बदल केलेला नाही. २०१४ साली देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर संसदेत प्रवेश करताना संसदेच्या प्रवेशदारावर ते नतमस्तक झाले होते. त्यानंतर पीएमच्या खुर्ची पहिल्यांदा बसताना त्यांनी देशाच्या विकासाचा पण घेतला. या पणानुसार त्यांनी गेली १० वर्षांत सर्व घटकांना न्याय देऊन देशाचा कायापालट केला.

निवडणुकीत राज्यात माविआच्या  घटक पक्षांकडून महायुतीवर खोटेनाटे, बिनबुडाचे, तथ्यहीन आरोप केले जात आहेत. खोटे बोला पण रेटून बोला अशापद्धतीने मविआतील नेतेमंडळी बोलत आहे. विरोधकांकडे विकासात्यमक अजेंडा नसल्यामुळे त्यांच्याकडून धर्मा धमांत व जाती-जातीत तेढ निर्माण करुन मतांचे राजकारण केले जात आहे. देशात ६० वर्षे काँग्रेसची सत्ता होती. मात्र, त्यांनी देशाच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतले नाही. मात्र भाजप ने कश्मीर मधील ३७० कलम हटविण्याचा धाडसी निर्णय मोदी सरकारने घेतला. ५०० वर्षांचा राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावून अयोध्येत भव्य राममंदिर - बांधले असून आता लाखो भक्त रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. मागील १० वर्षांत मोदी सरकारने अगणित चांगले निर्णय घेत देशाची प्रतिमा जगात उंचविण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्वगुरु म्हटले जात आहे. ओबीसी आयोगाला घटनात्मक अधिकारी प्राप्त करून देण्याचे काम मोदी सरकारने केले.

अशोक नेते म्हणाले, लोकसभा मतदारसंघातील उबाठा उमेदवार विनायक राऊत हे आपण अडीज लाखांच्या मताधिक्यांनी निवडून येणार असे सांगत आहे. मात्र, त्यांचे हे स्वप्नच राहणार आहे, या मतदारसंघा तून महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा १०१ टक्के विजय पक्का असल्याचा दावाही त्यांनी केला.