पंतप्रधान, राष्ट्रपती यांचा मालवण दौरा आणि किनारपट्टी वरील अनधिकृत बांधकाम हटविण्याचा दुरान्वये संबंध नाही

राजकीय हेतूने गैरसमज पसरवण्याचे काम
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 27, 2023 14:08 PM
views 339  views

  • लोकशाही दिनात झाली होती तक्रार


  • तक्रारदार महाविकास आघाडीचा पदाधिकारी 


  • भाजपा मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांचा गौप्यस्फोट


मालवण : राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचा मालवण दौरा आणि मालवण किनारपट्टीवरील अनधिकृत बांधकामे हटविण्याचा निर्णय याचा त्यांच्या दौऱ्याविषयी दुरान्वये संबंध नाही. लोकशाही दिनात एका नागरिकाने तक्रार करत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार  व्यवसायिकांना प्रशासनाने नोटीस काढली आहे. तक्रारदार नागरिक हा महाविकास आघाडीचा पदाधिकारी असल्याचा गौप्यस्फोट मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर यांनी केला आहे. 


मालवण किनारपट्टीवरील अनधिकृत बांधकामे हटविण्याबाबत प्रशासनाने संबंधितांना नोटीसा काढत कारवाई सुरू केली आहे. या कारवाई नंतर पर्यटन व्यवसायिक, मच्छीमार यांनी या कारवाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याशी जोडला होता. जर पंतप्रधान यांचा मालवण दौरा आम्हाला विस्थापित करण्यासाठी असेल तर आम्ही विरोध करणार असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर यांनी या कारवाईचा आणि पंतप्रधानांच्या दौऱ्याचा संबंध काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. तोरसकर म्हणाले, प्रशासनाने मालवण किनारपट्टीवरील अनधिकृत बांधकामे हटविणे संदर्भात सबंधित व्यावसायिक यांना नोटिसा बजविल्या आहेत. (दिनांक ०३/१०/२०२३).सदरच्या नोटीस ही लोकशाही दिनात उपस्थित केलेल्या एका नागरिकाच्या तक्रारीच्या अनुषंगाने बजाविण्यात आल्या आहेत. सदरच्या नागरिकाने पर्यटन व्यावसायिक यांच्या अनधिकृत बांधकाममुळे आपल्या व्यवसायावर तसेच वहिवाट याच्यावर बाधा येत आहे. तसेच सदरच्या अतिक्रमणावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने सबंधित व्यक्तींना नोटिसा बजावल्या आहेत. यामधे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मालवण भेट याचा दुरान्वये सबंध नाही. काही राजकीय हेतूने प्रेरित माणसे व्यापारी, पर्यटन व्यावसायिक तसेच मच्छीमार या मध्ये गैरसमज पसरवून वातावरण बिघडविण्याचे काम करीत आहेत. विशेष म्हणजे सदर विषयातील तक्रारदार नागरिक हा मविआ आघाडीचा पदाधिकारी आहे. पंतप्रधान व राष्ट्रपती यांचा नौदल दिनानिमित्त होणारा मालवण दौरा ऐतीहासिक असून मालवण तसेच सिंधुदुर्ग किल्ला जगाच्या नकाशावर येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकोट मध्ये होणाऱ्या पुतळा यामुळे पर्यटनाचे नवीन ठिकाण निर्माण होत आहे. त्याचा फायदा स्थानिक व्यापारी, पर्यटन व्यावसायिक तसेच मच्छीमार यांनाच होणार आहे. त्यामुळे मच्छीमार व पर्यटन व्यवसायिक यांनी टोकाची भूमिका घेऊ नये तसेच कुठच्याही अफवेला बळी पडू नये असे आवाहन तोरसकर यांनी केले आहे.

त्याचबरोबर तालुका प्रशासन जिल्हा प्रशासन सोबत संबंधित विषयात चर्चा चालू आहे. लवकरच तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी यांची मच्छीमार तसेच पर्यटन व्यावसायिक सोबत बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तरी मच्छीमार व पर्यटन व्यावसायिक यांनी आंदोलनात्मक पवित्रा न घेता प्रशासनाशी संवाद साधावा व त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्या माध्यमातून प्रयत्न चालू असल्याचे भाजपाचे मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी म्हटले आहे.