भाजपच्यावतीने सावंतवाडी मंडलमध्ये भजनी साहित्य वाटप

Edited by: विनायक गांवस
Published on: August 26, 2025 13:53 PM
views 214  views

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सावंतवाडी मंडल मधील भजनी मंडळांना भजनी साहित्य वाटप करण्यात आले. भाजप युवा नेते, माजी पंचायत समिती संदिप गावडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. 

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला भजनी मंडळांना प्रोत्साहन देऊन सांस्कृतिक चळवळ सुरू ठेवण्याच्या हेतूने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील संदिप गावडे यांच्यामार्फत भजनी मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले. सावंतवाडी मंडलातील भजनी मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, भाजपा आंबोली मंडल अध्यक्ष 

संतोष राऊळ, जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगांवकर, खरेदी विक्री संघ तालुकाध्यक्ष प्रमोद गावडे, माजी सभापती पंकज पेडणेकर, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक, माजी जि.प. सदस्य पंढरीनाथ राऊळ, गेळे सरपंच सागर ढोकरे आदींसह भजन मंडळांचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी संदीप गावडे म्हणाले, या उपक्रमाचे प्रेरणास्थान प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आहेत. त्यांनी पालकमंत्री असताना शासनाच्या माध्यमातून उपक्रम राबविला. आताचे पालकमंत्री नितेश राणे यांनीही ती योजना पुढे चालवली आहे. मात्र, शासनाच्या मर्यादा येत असल्याने काही मंडळांना भजन साहित्य वाटप करता येत नव्हत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा अन् संघटन या उपक्रमातून भजन साहित्य वाटप आम्ही करत आहोत. भजन मंडळ हा प्रत्येक वाडीचा, गावाचा श्वास असतो. वर्षभर भजन सेवा ही मंडळी करतात. त्यांच्या सेवेला छोटीशी भेट म्हणून आम्ही हा उपक्रम राबवित आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भजन मंडळांना २५ हजारांच अनुदान जाहीर केलं आहे. त्यासाठी त्यांचे ऋण व्यक्त करतो अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.