LIVE UPDATES

भाजप शिष्टमंडळाने दिली बांदा पीएचसीला भेट

सोयी सुविधांचा घेतला आढावा ; पालकमंत्र्यांचं वेधणार लक्ष
Edited by: लवू परब
Published on: June 17, 2025 14:07 PM
views 148  views

बांदा : पावसाळा सुरू झाल्यावर दरवर्षी बांदा व परिसरात साथीचे रोग तसेच गंभीर असे डेंग्यू, मलेरिया, तापसरी ते आजार मोठ्या प्रमाणात वाढू लागतात. त्याकरिता पूर्व खबरदारी म्हणून आज बांदा भाजपच्या शिष्टमंडळाने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राची भेट घेतली व तेथील सोयी सुविधा, औषधांची पर्याप्तता, तसेच इतर सर्व अत्यावश्यक गोष्टींचा आढावा घेतला. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी पावसाळी परिस्थितीचा सामना करण्याकरता इतर सर्व सोयीसुविधा पर्याप्तपणे उपलब्ध असून आपल्याला सध्या दोन नर्सची आवश्यकता असल्याचे सांगितले. शहराध्यक्ष बाबा काणेकर व निलेश कदम यांनी ॲम्बुलन्सच्या उपलब्धता नसल्यामुळे रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीचा मुद्दा देखील उपस्थित केला.

यावेळी सरपंच प्रियांका नाईक यांनी नर्स, 30 बेडच्या रुग्णालयास परवानगी, ॲम्बुलन्स, आवश्यक औषधे अशा सर्व मागण्यांचे पत्र देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी शिष्टमंडळाने आरोग्य केंद्रातील रुग्णांची भेट घेऊन सोयी सुविधांबाबत विचारपूस केली. बांदा व दशक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने या सर्व मागण्यांकरिता भाजपचे शिष्टमंडळ घेऊन पालकमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे गुरु कल्याणकर व माजी उपसरपंच बाळू सावंत यांनी सांगितले.

यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, माजी उपसरपंच बाळू सावंत, बांदा मंडल क्रीडा संयोजक गुरु कल्याणकर, शहराध्यक्ष बाबा काणेकर, ग्रा.स. रत्नाकर आगलावे, बुथ अध्यक्ष राकेश केसरकर, निलेश उर्फ पापू कदम, शैलेश केसरकर, हेमंत दाभोलकर, सिद्धेश महाजन व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.