
सावंतवाडी : राज्यात झालेल्या शिंदे - फडणवीस सरकारनंतर 'भाजप' अन् 'बाळासाहेबांची शिवसेना' यांच्यात पहिली युती ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात झाली आहे. याला निमीत्त ठरलं आहे ते सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक. भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या समर्थकांनी सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक अनिल क्षीरसागर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजप नेते महेश सारंग, बाळासाहेबांची शिवसेनेचे अशोक दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत खरेदी विक्री संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, भाजप अन् बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातील पहिल्या युतीच्या पॅनलची अधिकृत घोषणा ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. भाजप अन् बाळासाहेबांची शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खरेदी विक्री संघासाठी अर्ज दाखल करण्यात आले असून आगामी काळात देखील ही युती पहायला मिळेल असं मत भाजप नेते महेश सारंग यांनी व्यक्त केले. तर बाळासाहेबांची शिवसेना व भाजप एकत्रीत पणे ही निवडणूक लढणार असून भविष्यात देखील ही यूती दिसेल असं मत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी अशोक दळवी यांनी व्यक्त केले.
भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना अर्थात दीपक केसरकर यांचे समर्थक हे प्रतिस्पर्धी असून ही निवडणूक या दोन पक्षांच्या पॅनलमध्ये होणार होती. मात्र, राज्यातील राजकारणात शिंदे- फडणवीस सरकारच्या रूपानं उदयास आलेल नवं समीकरण व भाजप नेते महेश सारंग यांनी दोडामार्गातील पक्षांतर्गत वाद मिटवत आपल्या कुशल नेतृत्वाची दाखवून दिलेली झलक आज पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. खरेदी विक्री संघासाठी झालेली जिल्ह्यातील पहिली युती ही आगामी निवडणुकांची नांदी आहे. भविष्यात देखील असंच चित्र पहायला मिळेल असा विश्वास दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून व्यक्त केलाय.
सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजप नेते महेश सारंग, बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकारी अशोक दळवी, अनारोजीन लोबो, नारायण राणे, भाजपचे बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, गुरूनाथ पेडणेकर, प्रमोद सावंत, प्रमोद गावडे, उदय नाईक, लवू भिंगारे, मधू देसाई, प्रविण देसाई, आत्माराम गावडे, शशिकांत गावडे, सत्यवान पंडीत, भाऊ कोळमेकर, ज्ञानेश्वर परब, हरिश्चंद्र तारी, पांडुरंग नाईक, गजानन नाटेकर, नारायण हीराप, राजन रेडकर, पंढरी राऊळ, वासुदेव शिरोडकर, विनायक राऊळ आदी युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.