सावंतवाडी : शासनस्तरावर पूरग्रस्तांच्या नुकसानभरपाईचे पैसे येऊनही महसूल विभागाकडून लाभार्थ्यांच्या खात्यात ते वर्ग करण्यासाठी दिरंगाई होत आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस तथा बांद्याचे माजी उपसरपंच जावेद खतीब व गुरुनाथ सावंत यांच्या नेतृत्वाखाली महसूलचे अधिकारी समर्थन पेठे यांना घेराव घालत जाब विचारला.
यावेळी १२ ऑगस्टपर्यंत पैसे खात्यात वर्ग न केल्यास ३०८ लाभार्थ्यांना सोबत घेऊन सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा जावेद खतीब यांनी दिला. बांदा, इन्सुली, शेर्ले, वाफोली येथे २०१९-२० मध्ये आलेल्या महापुरात शेकडो व्यापारी व घरांचे नुकसान झाले. एकूण ३६६ जणांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. या लाभार्थ्यांना शासनस्तरावरून नुकसानभरपाईची रक्कम देखील मंजूर झाली. मात्र, सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातून ही रक्कम वर्ग करण्यासाठी चालढकल होत आहे. लाभार्थ्यांनी कित्येकवेळा याठिकाणी येऊन पाठपुरावा केला. पण, खात्यात रक्कम वर्ग करण्यासाठी दिरंगाई होत आहे. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने
खतीब व सावंत यांनी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात धडक देत जाब विचारला. यावेळी ३६६ पैकी ५८ जणांना भरपाई वर्ग केल्याची माहिती श्री. पेठे यांनी दिली. त्यामुळे लाभार्थी अधिकच आक्रमक झाले. गणेश चतुर्थी सण तोंडावर आला असून लवकरात लवकर भरपाईची रक्कम अदा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नुकसानग्रस्त लाभार्थ्यांची यादी तयार असून टप्प्याटप्प्याने रक्कम वर्ग करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान, १२ ऑगस्टपर्यंत रक्कम वर्ग न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी नुकसानग्रस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.