दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृतीसाठी बायोमॅट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 21, 2023 19:57 PM
views 74  views

सिंधुदुर्ग : केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस) आणि केंद्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून देण्यात येणारी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृती करीता बायोमॅट्रिक प्रमाणीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.


 राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल वर दोन्ही योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ असून राज्यात दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ अखेर एन. एम. एम. एस साठी मागील  परीक्षेत शिष्यवृत्तीधारक घोषित झालेल्या १९.६८२ पैकी ६.३३५ नवीन अर्ज तर नूतनीकरणाचे ३५,०४१ पैकी १६,०५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर दिव्यांग मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे २४२ नवीन व नूतनीकरणाचे २३६ पैकी ६६ अर्ज प्राप्त झाले आहेत. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारे विद्यार्थी, ज्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत त्या शाळेचे शाळा प्रमुख (एच.ओ.आय), नोडल अधिकारी (आय.एन.ओ), जिल्हा शिक्षणाधिकारी (डी.एन.ओ) आणि राज्य नोडल अधिकारी (एस.एन.ओ) यांचे या शिष्यवृत्ती योजनांकरीता चालू वर्षी पहिल्यांदाच बायोमॅट्रिक प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. बनावट अर्जाना प्रतिबंध करणेसाठी तसेच यंत्रणेतील जबाबदार अधिकारी/कर्मचाऱ्याकडून अर्जाची पडताळणी होण्यासाठी हा निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुढील महिन्यात बायोमॅट्रिक प्रमाणीकरण प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.


बायोमॅट्रिक प्रमाणीकरण प्रक्रियेसाठी आधार ही महत्वाची बाब असून प्रमाणीकरण झाल्यानंतर आधार मध्ये संबंधितांनी दुरुस्ती करू नये. आधार मध्ये दुरुस्ती करून घ्यायची असल्यास तो या प्रक्रीयेपूर्वी करून घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. दोन्ही शिष्यवृत्ती करीता ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ०२ आठवड्यांचा अवधी असून विहित कालावधीत नवीन व नूतनीकरणाचे अर्ज दाखल करावेत. तसेच शाळास्तरावर दिनांक १५ डिसेंबर २०२३ पर्यंत आणि जिल्हास्तरावर दिनांक ३० डिसेंबर २०२३ पर्यंत नोडल अधिकाऱ्यांनी अर्जाची पडताळणी कागदपत्रे तपासून करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.


शाळांनी एन.एस.पी २.० पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दरवर्षी प्रोफाईल अद्यावत करणे आवश्यक आहे. तसेच के. वाय. सी पडताळणी एकदाच करून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे त्या शाळेमधूनच ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती करीता विद्यार्थ्यांचे नाव व जन्मतारीख आधार नुसार असणे आवश्यक आहे. एन.एम.एम.एस परीक्षेचा निकाल पत्रकातील नाव व जन्मतारीख यामध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास इ. ९वी च्या नवीन विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शाळांनी शिक्षणाधिकारी यांचे मार्फत योजना संचालनालयास पाठविणे आवश्यक आहे. दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबत दिव्यांगत्वाचा प्रकार हा यु.डी. आय. डी. ओळखपत्र आणि एन.एस.पी २.० पोर्टल वरील अर्ज यामधील एकच असावा. शिवाय यु.डी. आय. डी. ओळखपत्रावरील जन्मतारीख व आधारवरील जन्मतारीख एकसारखी असल्यास ऑनलाईन अर्ज करता येईल.


एन.एम.एम.एस व दिव्यांग शिष्यवृत्ती व्यतिरिक्त इतर शिष्यवृत्तीचा विद्यार्थ्यास लाभ घ्यावयाचा असल्यास विद्यार्थास लॉगीन द्वारे नवीन / नुतनीकरण (withdraw) करता येईल. मात्र एकदा रद्द झालेला नूतनीकरणाचा अर्ज पुन्हा नव्याने दाखल करता येत नाही. दोन्ही शिष्यवृत्तीच्या नवीन अर्जामध्ये नोंदणी करताना चुकीची माहिती भरली असल्यास विद्यार्थी लॉगीन द्वारे अर्ज रद्द (withdraw) करून पुन्हा नव्याने अर्जाची आधार नुसार नोंदणी करावी.एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती धारकास इ. ९वी ते १२वी या चार वर्षात प्रती वर्षी रक्कम रु. १२,०००/- तर दिव्यांग शिष्यवृत्ती धारकास इ. ९वी, १०वी करीता रक्कम रु. २,०००/- ते १४,६००/- शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्तीची रक्कम आधार कार्ड ला लिंक असलेल्या विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. बँक खाते व मोबाईल क्रमांक आधार शी लिंक असणे आवश्यक आहे.. एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती करिता राज्य परीक्षा परिषदेकडून इयत्ता ८ वी त शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. त्यासाठी परीक्षा परिषदेच्या www.nmmnismsce .in या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा लागतो. तर शिक्षण संचालनालय योजना मार्फत शिष्यवृत्ती वितरणाची कार्यवाही केली जाते. यासाठी www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीधारक घोषित झाल्यानंतर विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागतो. चालू शैक्षणिक वर्षात २४ डिसेंबर २०२३ रोजी राज्यातून ७३० केंद्रावर परीक्षा होणार आहे. यासाठी १३ हजार ५२३ शाळातील २ लक्ष ६६ हजार २०२ विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. अशी माहिती डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र पुणे-१ यांनी दिली आहे.