गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 30, 2024 13:15 PM
views 1149  views

देवगड : देवगड तालुक्यातील - शिरगाव-कुवळे मार्गावर शिरगाव चौकेवाडी फाट्यानजीक बांबल्या गणपत पवार या दुचाकीस्वारावर गव्याने केलेल्या हल्ल्यात दुचाकीस्वार - गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

साळशी ओहोळानजीक कातकरी समाजाच्या वस्तीत राहणारे बाबल्या गणपत पवार हे शिरगावहून आपल्या (एमएच ०७, एक्यू ५४२) या दुचाकीने घराकडे जात असताना चौकेवाडी फाट्यानजीक त्यांच्यावर गव्याने हल्ला केल्याने दुचाकीची चेस मोडली असून, बाबल्या पवार यांनाही उजव्या हाताला आणि पायाला मार बसला आहे. ही घटना घडल्यानंतर याच मार्गावरून त्यांच्याच वस्तीत राहणारे सत्यवान पवार हे पत्नीसह दुचाकीवरून प्रवास करत असताना बाबल्या पवार हे गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने शिरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना शुक्रवारी अधिक उपचारांसाठी कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, देवगड वनपाल सारीक फकीर यांना माहिती मिळताच घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. तसेच जखमीचीही रुग्णालयात उपचार घेत असताना विचारपूस केली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, शिरगाव विभागप्रमुख मंगेश फाटक, अजित परब, मंगेश शिंदे, सूर्यकांत तावडे, राजेंद्र पोकळे उपस्थित होते. 

हल्ल्याची पंधरा दिवसांतील दुसरी घटना, वाहनचालकांत भीती

९ मार्च रोजी रात्री देवगड-नांदगाव मार्गावर शिरगाव राकसघाटी येथे चारचाकी गाडीवर गव्याने हल्ला करून दर्शनी भागाची काच फोडली होती. केवळ दैव बलवत्तर म्हणून चारचाकीतील प्रवासी वाचले होते. त्यानंतर शिरगाव-कुवळे मार्गावर पुन्हा गव्याच्या हल्ल्याची पुनरावृती झाल्याने ग्रामस्थ तसेच वाहनचालकांत भीतीचे वातावरण आहे. 

देवगड-नांदगाव मार्गावर शिरगाव राकसघाटी तसेच शिरगाव-कुवळे या मार्गावर दिवसेंदिवस गव्यांचा वावर वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिरगाव-कुवळे मार्गावर तिन्ही सांजेनंतर खासगी वाहनांची वर्दळ गव्यांचा वावर वाढल्याने भीतीमुळे कमी झाली आहे. वन विभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.