
दोडामार्ग : केर येथे लोकवस्तीत घुसलेल्या हत्तींना पिटाळण्यासाठी ग्रामवासियांसोबत गेलेले शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई यांच्यावरच रविवारी हत्तींनी हल्ला चढविला. पाच हत्तींपैकी एकाने त्यांचा पाठलाग केला. यावेळी स्वतःचा बचाव करताना ते गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे येतेय.
हत्तींच्या हल्ल्यात त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली असून म्हापसा गोवा येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वनविभाग हत्ती बंदोबस्त करण्यात अपयशी ठरल्याने ही दुर्घटना घडल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात असून संताप व्यक्त केला जात आहे. हत्तींची अशी वाढती दहशत शेतकऱ्याना जीवघेणी ठरत असल्याने गेल्याच महिन्यात प्रेमानंद देसाई यांनी तिलारी खोऱ्यातील सर्व सरपंच यांना एकत्र करत जन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यांनतर बैठका घेऊन शासन व वनविभाग यांनी केवळ शेतकरी व लोकप्रिनिधींनी यांची बोळवण केली. ठोस उपायोजना न झाल्याने लोकवस्तीत घुसलेल्या हत्तींना हुसकावून लावण्यासाठी रविवारी देसाई यांना शेतकरी व ग्रामवासियांसोबत बाहेर पडावे लागले. मात्र, हत्तींनी अचानक चडविलेल्या हल्ल्यात स्वतः ला वाचविताना ते गंभीर जखमी झाले आहेत. निदान आता तरी राज्यकर्ते व वनखाते यांनी जागे होणे आवश्यक आहे.