
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात देशातील कामगार संघटनेने ९ जुलै रोजी भारत बंदची घोषणा दिली आहे. बुधवारी होणाऱ्या या बंदमध्ये देशभरातील २५ कोटी कामगार भाग घेणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये बँकिंग, खाणकाम, पोस्टल सर्व्हिस, बांधकाम यासह अनेक क्षेत्रातील कामगार या बंदमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे देशातील प्रमुख सेवांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देशातील १० प्रमुख कामगार संघटनांनी या भारत बंदची घोषणा केली आहे. त्याचसोबत या संघटनांच्या संबंधित इतर कामगार संघटनांही त्यामध्ये भाग घेणार असल्याची माहिती आहे. केंद्र सरकारने कामगार विरोधी, शेतकरी विरोधी धोरण अवलंबल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे. सरकारच्या या धोरणांचा फायदा केवळ उद्योगपतींना, त्यांच्या उद्योगांना होणार असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.