
वैभववाडी : भुईबावडा पंचक्रोशीत गेल्या १५ दिवसांपासून विजेचा लपंडावं सुरु आहे. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. महावितरणच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास नागरिक आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात आहेत.
भुईबावडा परीसरात १६ मे ला वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.या दरम्यान या परिसरातील अनेक वीज खांब व वाहीन्या तुटल्या होत्या.तेव्हापासून या भागातील वीज पुरवठा विस्कळित झाला आहे.या भागातील मांगवली, आखवणे भोम पुनर्वसन, तिरवडे, ऐनारी, हेत, आखवणे, भोम, मोंदे, उपळे या गावातील दिवसभर सतत वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे घरातील टी. व्ही., रेफ्रीजेटर, संगणक, लॅपटॉप सारखी उपकरणे नादुरुस्त होत आहेत. या भागातील विस्कळित वीजपुरवठ्याचा परिणाम बँक, दवाखाना व इतर कामकाजावर होत आहे. शासकीय कामासाठी येणाऱ्या पंचक्रोशीतील नागरिकांना वीज पुरवठा सतत खंडित होत असल्यामुळे कामासाठी तासंतास ताटकळतं राहावे लागत आहे. याबाबत नागरिकांकडून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही वीज वितरणच्या कारभारात सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे संतप्त नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.तसेच अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या नळ योजनावर होत आहे.यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
महावितरणकडून या भागाकडे दुर्लक्ष ..
भुईबावडा भागात १५हून अधिक गावं येतात.हा सर्व भाग ग्रामीण आहे.मात्र या भागात वीज वितरण कंपनीकडून नेहमीच दुर्लक्ष करण्यात येतो.पावसाळ्यापूर्वी वीज वाहिन्यावरील झाडे तोडणे, खराब वीज वाहिन्या, खांब बदलणे गरजेचे आहे.अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व वीज खंबावर झाडी आलेली आहे. तर अनेक ठिकाणी वीज खांब नादुरुस्त झालेले आहेत. याबाबत संबधीत विभागाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात अडचण येत आहे.